Tikona Fort News : तिकोना गडावरील तटबंदी, बुरुजाच्या दुरुस्तीसाठी रविवारी 100 जणांचे श्रमदान

एमपीसी न्यूज – तिकोना गडावर तटबंदी आणि बुरुजाच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यासाठी साहित्य कामाच्या ठिकाणी पोहोचविण्याचे काम आज (रविवारी, दि. 17) करण्यात आले. 100 जणांच्या चमूने श्रमदान करून तटबंदीचे दगड कामाच्या ठिकाणी पोहोचवले.

किल्ले तिकोना गडावर तटबंदी आणि बुरुजाच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. म्हाळुंगे येथील व्हेरॉक कंपनीतील कामगार तिकोना गडावर भ्रमंतीसाठी आले होते. त्यावेळी गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या सदस्यांनी या 100 जणांच्या टीमला बांधकामासाठी लागणारे साहित्य गडावर पोहोचविण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. त्याला सर्व मावळ्यांनी सकारात्मक साद देत मानवी साखळी तयार केली. रविवारी रोप वे पासून कामाच्या ठिकाणी 100 जणांच्या टीमने 100 ताडबंदीचे दगड कामाच्या ठिकाणी पोहोचविण्यात आले.

सर्व दगड तळजाई माता ते चपेटदान मारुतीराय इथपर्यंत पोहोचविले. या कामासाठी मदत केल्याबद्दल दुर्गसंवर्धन संस्थेकडून सहभागी मावळ्यांचे आभार मानण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.