YCMH NEWS : कोरोनाच्या 46 हजार 489 रुग्णांवर यशस्वी उपचार, 1676 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरले. रुग्णालयात दीड वर्षात कोरोनाच्या 46 हजार 489 रुग्णांवर यशस्वी उपचार केले. तर, यादरम्यान 1676 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दाखल रुग्णांच्या संख्येत मृत्यूचे प्रमाण अवघे चार टक्के असून 96 टक्के रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली.

याबाबतची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण 10 मार्च 2020 रोजी आढळला. महापालिकेचे वायसीएम रुग्णालय कोविड समर्पित केले. तिथे फक्त कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात होते.

शहरात मे पर्यंत रुग्णांची संख्या कमी होती. जून ते ऑक्टोबर या कालावधीत रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत राहिली. त्यानंतर रुग्णसंख्या घटली. नोव्हेंबर ते यंदाच्या जानेवारी या काळात शहरात रुग्ण संख्येचा आलेख कमी झाला होता. परंतु, फेब्रुवारी 2021 पासून पुन्हा रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली. मेपर्यंत रुग्ण संख्या वाढत राहिली. त्यानंतर जूनपासून रुग्ण संख्या कमी झाली. सध्यस्थितीत शहरातील रुग्ण संख्या कमी झाली असून, दिवसाला शंभरच्या आत रुग्ण आढळून येत आहे.

कोरोनाकाळात शहराबरोबरच जिल्हाभरातून रुग्ण वायसीएममध्ये उपचार घेण्यास प्राधान्य देत होते. परिणामी, रुग्णालयात दाखल होण्यासाठी जागा मिळणे कठीण झाले होते. जिल्ह्यातील इतर रुग्णालयांच्या तुलनेत वायसीएमचा मृत्यूदर कमी होता. या काळात कोरोना रुग्णांसाठी रुग्णालय राखीव ठेवले होते.

परंतु, या काळात तातडीच्या आणि अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरू होत्या. तसेच, गरोदर महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रसूती आणि बालरोग विभाग देखील कोरोनाकाळात सुरू होता. या काळात 269 बालकांवर आणि 1062 गरोदर मातांवर उपचार केले आहेत. विशेष म्हणजे या काळात उपचार केलेल्या एकाही बालकांचा आणि गरोदर मातांचा मृत्यू झालेला नाही, असे डॉ. वाबळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.