Pune News : उद्यापासून शहरातील कचरा उचलणार-महापालिका आयुक्त विक्रम कुमार

उरुळी देवाची, फुरसुंगी ग्रामस्थांसोबत बैठक

एमपीसी न्यूज : गेल्या आठवडाभरापासून फुरसुंगी-उरूळी देवाची ग्रामस्थांकडून महापालिकेच्या कचरा संकलनाच्या गाड्या अडविल्या जात होत्या. परिणामी शहरातील कचरा उचलला जात नसल्यामुळे दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले होते. परंतु, ग्रामस्थांसोबतची बैठक यशस्वी होईल. त्यांचे आंदोलन मागे घेतल्यानंतर महापालिकेकडून तातडीने कचरा उचलण्याचे काम मार्गी लागेल, असा विश्वास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यक्त केला.

आज महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये कचऱ्याचा प्रश्न चांगलाच तापला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. परंतु महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कचरा प्रश्नाचे गांभिर्य ओळखून मुख्य सभा श्रद्धांजली प्रस्तावानंतर तहकूब केली.

त्यामुळे नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी होती. परंतु महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मुख्य सभेनंतर महापौर, उपमहापौर आणि सर्वपक्षीय गटनेत्यांची विशेष बैठक घेतली. त्यामध्ये ग्रामस्थांसोबत बैठकीनंतर शहरातील कचरा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन दिले.

आंबिल ओढा येथील सीमाभिंत बांधण्याचे काम सुरू

परतीच्या पावसामुळे दाणादाण उडालेल्या आंबिल ओढ्याच्या कडेला सीमाभिंत बांधण्यासाठीची वर्कऑर्डर काढण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या एक ते दीड वर्षांपासून प्रलंबित काम मार्गी लागले आहे.

महापालिकेच्या सर्वेक्षणानंतर 60  टक्के मोकळ्या जागेवर सीमाभिंत उभारणीचे काम केले जाईल. तर उर्वरीत 40 टक्के जागेवरील अतिक्रमण हटवून त्यानंतर सीमाभिंत पुढे वाढवली जाईल, असेही आयुक्त कुमार यांनी यावेळी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.