Pimpri: शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना राज्यसेवेत परत पाठविणार

महासभेत सत्ताधा-यांनी उपसूचनेद्वारे केला ठराव; उपसूचना घुसडली 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना पुन्हा राज्य सेवेत पाठविण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत सत्ताधा-यांनी उपसूचना घुसडून त्याबाबतचा ठराव केला आहे. सभावृत्तांत या ठरावाचा उल्लेख असला तरी महासभेत या उपसूचनेचे वाचनच झाले नाही. त्यामुळे या ठरावाचे नेमके ‘गौडबंगाल’ काय याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. तसेच शिक्षण समितीच्या सदस्यांना देखील या ठरावाची कल्पना नाही. त्यामुळे उपसूचना घुसडविणा-या सत्ताधा-यांच्या भूमिकेविषयी संशयाचे धुके निर्माण झाले आहे. 

महापालिकेतील शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर यंदापासून  शिक्षण समिती अस्तित्वात आली आहे. शिक्षण विभागाच्या पहिल्या प्रशासन अधिकारी म्हणून ज्योत्स्ना शिंदे यांची पिंपरी महापालिकेत 24 मे 2018 रोजी प्रतिनियुक्तीवर बदली झाली होती. त्यापूर्वी त्या पुण्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार कक्षाच्या सहायक संचालकपदी कार्यरत होत्या. पिंपरी महापालिकेत रुजू झाल्यापासून शिंदे यांचे सत्ताधा-यांशी सुर जुळाले नाहीत. शिक्षण समितीच्या पदाधिका-यांचे देखील त्यांच्याशी पटले नाही. त्यांच्या कार्यशैलीबाबत सत्ताधा-यांना आक्षेप होता.

ऑक्टोबर महिन्याची तहकूब सभा 31 ऑक्टोबर रोजी पार पडली. या सभेत सत्ताधारी भाजपने शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना पुन्हा राज्य सेवेत पाठविण्याची उपसूचना घुसडली. त्याबाबतचा ठराव केला. सभावृत्तांत या ठरावाचा उल्लेख असला तरी महासभेत या उपसूचनेचे वाचनच झाले नाही. त्यामुळे  शिक्षण समितीच्या सदस्यांसह सत्ताधारी पक्षाच्या अनेक नगरसेवक, त्याचबरोबर विरोधी पक्षातील नगरसेवकांना या ठरावाची पुसटशीही कल्पना नाही. असा ठराव केल्याबाबत बहुतांश नगरसेवक अनभिज्ञ आहेत. उपसूचना घुसडून ठराव केल्यामुळे यामगे नेमके ‘गौडबंगाल’ काय आहे याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

शिक्षण समितीच्या सदस्या अश्विनी चिंचवडे म्हणाल्या, ‘ऑक्टोबर महिन्याची महासभा संपेपर्यंत आम्ही सभेला हजर होतो. ज्या विषयाला उपसूचना दिली असल्याचे सांगितले जात आहे. त्या विषयाला प्रत्यक्षात उपसूचना देण्यात आली नाही. त्याबाबतची उपसूचना आम्ही संपूर्ण वाचायला लावली होती. परंतु, सत्ताधा-यांनी प्रशासन अधिकारी शिंदे यांना राज्य सेवेत पाठविण्याची उपसूचना घुसडली आहे. आम्ही शिक्षण समितीचे सदस्य असूनही याबाबतचा ठराव केल्याची आम्हाला अद्यापही कोणतीही कल्पना दिली गेली नाही. हे अत्यंत चुकीचे आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.