Talegaon : स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अद्ययावत अभ्यासिका आणि ग्रंथालय सुरू करणार – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता सिद्ध करता यावी म्हणून तळेगाव दाभाडे येथे दहा कोटी रूपये खर्चून अद्ययावत अभ्यासिका आणि ग्रंथालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्यमंत्री संजय(बाळा) भेगडे यांनी शनिवारी(दि.२०) येथे केली.
पै. विश्वनाथराव भेगडे प्रतिष्ठान संचलित सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भेगडे बोलत होते.

राज्याच्या कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सह्याद्री इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे प्रेस क्लब आणि नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कामगार संघटनेच्या वतीने संजय भेगडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थापक गणेश भेगडे, अध्यक्ष सुनील भेगडे, सचिव दत्तात्रेय नाटक, खजिनदार राहुल गोळे,शालेय समितीचे अध्यक्ष रामराव जगदाळे,ज्येष्ठ संचालक अशोक कृष्णाजी भेगडे,बी.एम.भसे, विलास भेगडे, नगरसेवक अरुण भेगडे पाटील, सुनील गायकवाड, खंडुजी टकले, रवींद्र धारणे, मुख्याध्यापिका वैशाली बोंद्रे, सविता खर्डे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यमंत्री भेगडे पुढे म्हणाले, की मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे. मोबाइलचे मुलांना एक प्रकारचे व्यसनच लागले आहे. हे घातक आहे.त्यामुळे सुसंवाद हरवत चालला आहे. मोबाईलच्या व्यसनातून मुलामुलींची सुटका करून त्यांना अभ्यासाबरोबरच मैदानी खेळासाठी पुरेसा वाव दिला पाहिजे. शैक्षणिक व्यवस्थेचा केंद्रबिंदू विद्यार्थी असल्याचे पालकांनी सतत लक्षात ठेवले पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्यासाठी मार्गदर्शन केंद्र असावे, त्यासाठी नगरपालिकेच्या भुजबळ हॉलच्या जागेवर दहा कोटी रूपये खर्चून अद्ययावत अभ्यासिका आणि ग्रंथालय सुरू करण्यात येईल. त्याचे भूमीपूजन येत्या महिनाखेरीस होईल.

नजीकच्या काळात पर्यावरणपूरक दळणवळण यंत्रणांना लागू करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या धोरणाचा संदर्भ देत राज्यमंत्री भेगडे पुढे म्हणाले, की त्यादृष्टीने अभ्यासक्रम आणि कौशल्य विकासाच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
संस्था अध्यक्ष सुनील भेगडे यांनी शाळाविस्तार आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी प्रेस क्लबतर्फे राज्यमंत्र्यांचा शाल व फुलरोप देऊन विषेश सत्कार करण्यात आला. यावेळी प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष विलास भेगडे, उपाध्यक्ष गणेश बोरूडे, कार्याध्यक्ष अमीन
खान, खजिनदार ऋषिकेश लोंढे, सल्लागार विवेक इनामदार, रमेश जाधव गुरुजी, दिलीप कांबळे, गणेश दुडम, संतोष थिटे, राधाकृष्ण येणारे,
काकासाहेब काळे, घुनाथ सोनटक्के, कैलास भेगडे प्रेस फोटोग्राफर चित्रसेन जाधव, अंकुश दाभाडे आदी उपस्थित होते.

नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी, माजी नगरसेवक आयुब सिकिलकर आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संजय भेगडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अमीन खान म्हणाले, की ज्ञान, राष्ट्रभक्ती, स्वावलंबन आणि विनम्रता या चतु:सुत्रीवर आधारित सह्याद्री इंग्लिश स्कूलने याच गुणांची प्रचिती देणा-या राज्यमंत्री भेगडे यांचा केलेला सत्कार समर्पक आहे. मंत्रालय प्रशासनातही बाळा भेगडे यांची आदरयुक्त आमदार म्हणून चांगली प्रतिमा आहे. मित्र म्हणून गणेश भेगडे यांनी राज्यमंत्र्याच्या यशात दिलेल्या योगदानाचा उल्लेख करून खान पुढे म्हणाले, की गुरूपेक्षाही मित्र श्रेष्ठ असतो, कारण गुरूला किमान गुरूदक्षिणा तरी द्यावी लागते; पण मित्राला तीही द्यावी लागत नाही.
यावेळी बाळा भेगडे ,गणेश भेगडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात देशी वृक्षरोपणाचा शुभारंभ करण्यात आला. मेघना कोळसे यांनी सूत्रसंचालन केले. आभार सचिवदत्तात्रेय नाटक यांनी मानले.

‘’मला राजकारणात यायचे नव्हते; परंतू गणेश भेगडे यांनी परिस्थितीची गरज म्हणून मला केवळ राजकारणातच आणले नाही, तर आमदारकीपासून ते राज्यमंत्रीपदापर्यंत त्यांनी रात्रंदिवस एक करून मार्गदर्शक मित्र म्हणून मला साथ दिली. त्यांनी सर्वांना संघटित केल्याने आज मोठा जनाधार असलेला कार्यकर्ता म्हणून माझी ओळख झाली आहे. याचे श्रेय गणेशभाऊला जाते. मी राज्यमंत्री जरी असलो तरी खरेतर ते या सर्वांच्या कष्टाचे फळ आहे.’’

संजय (बाळा) भेगडे, राज्यमंत्री.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.