Pimpri News: साहित्य क्षेत्राला डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची कमी जाणवेल- साहित्यिकांची श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – जेष्ठ साहित्यिक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांचा पिंपरी-चिंचवड शहरातील साहित्यिक व श्रमिक विश्वात मोठा चाहता वर्ग आहे. त्यांचे साहित्य लेखन,वैचारिक लेखन हे तरुणांना प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या जाण्याने साहित्य व समीक्षा क्षेत्रात नेहमीच त्यांची कमी जाणवेल, अशा शब्दात साहित्यिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले, सामाजिक भान असलेले लेखक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे मराठी ग्रामीण साहित्यात मोठे योगदान आहे. ग्रामीण कथालेखक, कादंबरीकार, कवी, समीक्षक अशी त्यांची ओळख आहे. ‘राजधानी’,’वारसा’, ‘सावित्रीचा निर्णय’ या त्यांच्या दीर्घकथा प्रसिद्ध आहेत. ‘गांधारीचे डोळे’, ‘मध्यरात्र’, ‘पराभव’ या त्यांच्या कादंबऱ्या मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत. महात्मा फुले यांज्या जीवनावरील डॉ. कोत्तापल्ले यांचा ‘ज्योतीपर्व’ हा ग्रंथ त्यांच्या सामाजिक व परिवर्तनवादी विचारांची साक्ष देतो. सर नेहमी स्मरणात रहातील.

Pimpri News: ‘जॅकवेल’च्या कामात भ्रष्टाचार किंवा भाजपा नेत्यांचा सहभाग असल्याचे सिद्ध करा – एकनाथ पवार

लेखक कवी अॅड.महेंद्रकुमार गायकवाड म्हणाले, मराठी साहित्य समृद्ध करणारे व होतकरू,नवोदित साहित्यिकासाठी ते आधारवड होते.त्यांच्या लेखनातून व्याख्यानातून तळमळ तडफड व्यक्त व्हायची. शाहू,फुले,आंबेडकर, अण्णाभाऊ साठे या महामानवांची नावे घेण्याची पात्रता कोणाची असू शकते यावर ते परखड बोलायचे. त्यामुळे त्यांचे खटके राजकारणी लोकांशी उडायचे. विचारांची अनमोल शिदोरी आम्हाला देऊन प्रखर समाजवेदना बेडर पुरोगामी विचारांचे पाईक आदरणीय डॉ. नागनाथ कोत्तापल्ले सरांना श्रद्धांजली!

मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे म्हणाले, डॉ. नागनाथ कोत्तापले हे समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक व समीक्षक मानले जातात. ते श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, कथाकार, कादंबरीकार, समीक्षक तसेच माजी संमेलनाध्यक्ष, माजी कुलगुरू होते. त्यांच्यातल्या लेखकाचा जो दृष्टिकोन होता. तो समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडणारा होता. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झालेले पाहयाला मिळते. त्यांचे साहित्य लेखन,वैचारिक लेखन हे तरुणांना प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या जाण्याने साहित्य व समीक्षा क्षेत्रात नेहमीच त्यांची कमी जाणवेल!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.