Tokyo Olympic 2020 : टोकियोमधून आणखी एक गुड न्यूज, पुरुष हॉकी टीम सेमी फायनलमध्ये

एमपीसी न्यूज – सुवर्णपदकाचे स्वप्न भंगलेल्या भारताच्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी सिंधू पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. तसेच, आता भारतीय पुरुषांचा हॉकी संघ सेमी फायनलमध्ये दाखल झाला आहे.

ग्रेट ब्रिटनला 3-1 असं नमवून भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. जवळपास चार दशकानंतर भारतीय पुरूष हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहोचला असून, भारतीय संघ सुवर्णपदकापासून फक्त दोन विजय दूर आहे.

उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटेनला पराभूत करत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना बेल्जियमशी होणार आहे. बेल्जियमने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनला 3-1 अशी धूळ चारत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी हे दोन संघ उपांत्य फेरीत भिडणार आहेत. स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची कामगिरी उल्लेखनीय आहे. उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँडशी अटीतटीचा सामना झाला. सामना 2-2 ने बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूटआउटमध्ये निर्णय लागला.

1980 च्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं सुवर्ण पदक पटकावलं. भारताचं हे हॉकीमधलं शेवटचं पदक होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.