Tokyo Olympic 2021 : भारतासाठी आणखी एक पदक निश्चित, रवी दहियाची अंतिम फेरीत धडक

भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव, कांस्यपदकासाठी ग्रेट ब्रिटनसोबत होणार सामना

एमपीसी न्यूज – टोकीयो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आणखी एक पदक निश्चित झाले आहे. कुस्तीपटू रवी कुमारने 57 किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या नुरिस्लाम सनायेववर मात करत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे भारताचे ऑलिम्पिकमध्ये चौथे पदक निश्चित झाले आहे. तर दुसरीकडे भारतीय महिला हॉकी संघाला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे संघाचे फायनलमध्ये जाण्याचे स्वप्न भंगले आहे. अर्जेंटिना सोबत झालेल्या सामन्यात भारतीय संघ 2-1 ने पराभूत झाला आहे.

पहिल्या फेरीत कुस्तीपटू रवी कुमार दहियाने दोन गुणांची आघाडी घेतली मात्र त्यानंतर सनायेवने रवीला चीतपट करत थेट आठ गुणांची कमाई केली. या धक्क्यातून रवीने एक गुण कमावला. रवीने तीन गुणांची कमाई करत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. सनायेवच्या पायाला दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले. यानंतर रवीने सनायेवला चीतपट करत बाजी मारली.

खाशाबा जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त, साक्षी मलिक यांच्यानंतर ऑलिम्पिक पदक पटकावणारा रवी पाचवा मल्ल असेल. आतापर्यंत भारताने टोकीयो ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांची कमाई केली आहे.

तसेच भारतीय महिला हॉकी संघाने चमकदार कामगिरी दाखवत उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, उपांत्य सामन्यात भारतीय संघ 2-1 ने पराभूत झाला. आता भारतीय महिला हॉकी संघ कांस्यपदकासाठी ग्रेट ब्रिटनसोबत खेळणार आहे. ग्रेट ब्रिटन संघाने नेदरलँड्सचा पराभव केला आहे.

दरम्यान, महिला हॉकीचा अंतिम सामना नेदरलँड्स आणि अर्जेंटिना या दोन संघात रंगणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.