Tom Hanks talks about successful recovery – हॉलिवूड अभिनेते टॉम हँक्स यांची कोरोनावर सहीसलामत मात

Hollywood actor Tom Hanks Overcome the corona safely : टॉम आणि त्यांची पत्नी रीटा या दोघांनाही करोनाची लागण झाली होती.

एमपीसी न्यूज – सध्याच्या या काळात कोरोनाच्या संसर्गाचा आकडा लाखांचे टप्पे पार करत आहे. एकाच दिवसात लागण होणा-या रुग्णांची संख्या वाढती आहे. विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सध्या जगभरातील लोक त्रस्त आहेत. फक्त भारतातीलच नव्हे तर हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींसह जगभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. अभिनेता टॉम हँक्स यांनी मात्र कोरोनावर यशस्वीरित्या मात केली.

‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कोरोना उपचारादरम्यान आलेला आपला अनुभव सांगितला. टॉम आणि त्यांची पत्नी रीटा या दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती.  त्यावेळी ते ऑस्ट्रेलियात होते. या साथीच्या पहिल्याच टप्प्यात त्यांना ही लागण झाली होती. ते त्यातून सहीसलामत बाहेर आले.

या कालावधीविषयी बोलताना टॉम म्हणाले, ‘माझ्या तुलनेत माझी पत्नी रीटा हिला प्रचंड त्रास झाला. तीन आठवडे तिने काहीही खाल्लं नव्हतं. आम्हाला जागेवरुन उठताही येत नव्हतं. शरीरात प्रचंड वेदना जाणवत होत्या. खूप थकल्यासारखं जाणवायचं.

त्यानंतर आम्हाला एका स्थानिक रुग्णालयात भरती करण्यात आलं. उपचारादरम्यान आम्ही क्वारंटाईनमध्ये होतो. आमच्या खोलीत फक्त डॉक्टर्स आणि परिचारिकाच येत असतं.

योग्य उपचार देऊन आमची रोगप्रतिकार शक्ती वाढवली. परिणामी आम्ही तीन आठवड्यात बरे होऊन घरी परतलो’, असा अनुभव टॉम हँक्स यांनी सांगितला.

टॉम हँक्स आणि रीटा विल्सन पहिले सेलिब्रिटी होते ज्यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. ‘कास्ट अवे’, ‘फॉरेस्ट गंप’, ‘कॅप्टन फिलिप्स’, ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ या सारखे एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट देणारा हा अभिनेता असून त्यांनी करोनामधून बरं झाल्यानंतर २७ मार्चला लॉस एंजेलिसमध्ये येऊन फोटोशूट केले होते.

टॉम हँक्स व्यतिरिक्त एद्रिस एल्बा, कॅथी ग्रीफिन, बॉण्ड गर्ल ओल्गा कुरिलेन्को या कलाकारांनी देखील करोना विषाणूवर यशस्वीरित्या मात केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like