Pune : 22 देशांतील प्रतिनिधींनी केला पुणे स्मार्ट सिटीचा दौरा

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधी मंडळांकडून पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचे कौतुक

एमपीसी न्यूज – विविध २२ देशांतील पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील २७ व्यावसासियक तज्ज्ञांनी नुकताच पुणे स्मार्ट सिटीचा दोन दिवसीय अभ्यास दौरा केला. तसेच, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या उच्चाधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर दक्षिण कोरियातील इंचॉन स्मार्ट सिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकानेही पुणे स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली व विकासकामांचा आढावा घेतला. विविध प्रतिनिधीमंडळांसोबत नवकल्पना आणि विचारांची देवाणघेवाण करत पुणे स्मार्ट सिटी मार्गदर्शकाची भूमिका प्रभावीपणे बजावत आहे. 

स्मार्ट शहरांचे नियोजन आणि रचना याबाबत परदेशी व्यावसायिकांना प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत गृहनिर्माण व नागरी विकास महामंडळाच्या (हडको) ह्युमन सेटलमेंट मॅनेजमेंट इंस्टिट्यूटच्या वतीने हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अफगाणिस्तान, अर्मेनिया, भूतान, बोटस्वाना, कंबोडिया, काँगो, इजिप्त, इथिओपिया, गाम्बिया, ग्वाटेमाला, इराक, केनिया, लेसोतो, मॉरिशिअस, नेपाळ, नायजर, रशिया, श्रीलंका, ताजिकिस्तान, टांझानिया, युगांडा, झिंबाब्वे या देशांतील प्रतिनिधींचा समावेश होता.

दक्षिण कोरियाहून आलेल्या पथकात इंचॉन स्मार्ट सिटीचे संचालक श्री. डकिल किम, सरव्यवस्थापक श्री. होए किम आणि सल्लागारा जोंग आन सूल यांचा समावेश होता. तसेच, राष्ट्रीय संरक्षण संपदा व्यवस्थापन संस्थेचे सहसंचालक श्री. शंकर रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील १५ अधिकाऱ्यांच्या पथकानेही अलीकडेच पुणे स्मार्ट सिटीचा दौरा केला. तत्पूर्वी, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्ये मंत्रालयाचे सचिव श्री. दुर्गा शंकर मिश्रा आणि स्मार्ट सिटी मिशनच्या अतिरिक्त सचिव डॉ. इंदू जाखड यांनीही स्वतंत्रपणे भेटी देऊन पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच, स्ट्रेल्का या रशियन सल्लागार संस्थेच्या पथकानेही पुणे दौरा केला.

स्मार्ट सिटीचे रस्ते पुनरर्चना, प्लेस मेकिंग, पब्लिक बायसिकल शेअरिंग, कमांड अँड कंट्रोल सेंटर, पुणे वाय-फाय व स्मार्ट इलेमेंट्स या कामे पूर्ण झालेल्या प्रकल्पांची तसेच सध्या कामे सुरू असलेले, आगामी प्रस्तावित प्रकल्पांविषयी सादरीकरणांद्वारे या प्रतिनिधींना माहिती देण्यात आली. बाणेरमधील ज्युपिटर हॉस्पिटलसमोरील ‘रिन्यू व एनर्जाईज’ या दोन ‘प्लेस मेकिंग’ साईट्स आणि विविध पथदर्शी प्रकल्पांना भेटी देऊन त्यांनी त्याबाबत माहिती घेतली.

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “देशातील आणि देशाबाहेरून जगाच्या विविध भागांतून येणाऱ्या प्रतिनिधींचे आम्ही स्वागत करतो. पुणे स्मार्ट सिटीच्या काही महत्त्वाच्या प्रकल्पांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख प्राप्त झाली आहे. त्याबद्दल इतर शहरांशी संवाद साधण्यास आणि त्यांच्याकडून अभिनव कल्पना स्वीकारण्यास आम्ही उत्सूक असतो.”

गाम्बिया देशाचे प्रतिनिधी श्री. ऍसन कॉली म्हणाले, “स्मार्ट सिटी बनण्याच्या दिशेने पुण्याची वाटचाल सुंदर आहे. येथील नागरिकांसाठी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प उपयुक्त ठरतील. तसेच, आमच्या देशातही याची तेथील अनुकूलतेनुसार अंमलबजावणी करण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, त्यामुळे हा दौरा आमच्यासाठी खास आहे.”

स्मार्ट सिटी मिशनच्या अतिरिक्त सचिव डॉ. इंदू जाखड त्यांच्या पुणे भेटीदरम्यान बोलताना म्हणाल्या, “इतर स्मार्ट सिटींच्या तुलनेत पुणे स्मार्ट सिटीने अनेक उपक्रम सर्वसमावेशकपणे राबवले आहेत. त्यामुळे पुणे दौरा हा एक चांगला अनुभव होता.”

त्याचप्रमाणे, जयपूर स्मार्ट सिटीला भेट दिल्यानंतर स्ट्रेल्का या रशियन संस्थेचे सीईओ डेनिस लिओनतिएव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पुणे स्मार्ट सिटीचा दौरा केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “जयपूरपेक्षा पुणे स्मार्ट सिटीचे प्रकल्प अधिक प्रगतिपथावर असल्याचे दिसते.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.