Machhal JK : जम्मू काश्मीरच्या मच्छल खो-यात पोहोचले पुण्यातील पर्यटक, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आलेल्या पर्यटकांमुळे स्थानिक भारावले

एमपीसी न्यूज – पृथ्वीवरील स्वर्ग अशी जम्मू आणि काश्मीरची ओळख आहे. काश्मीरमध्ये मनसोक्त फिरण्याचा आनंद घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पण, सीमावाद आणि आंतकवादी कारवायांमुळे याभागात जायला नागरिक घाबरतात. जम्मू काश्मीरच्या कुपवाड जिल्ह्यात मच्छल हा दुर्गम भाग आहे. थंड आणि बर्फाच्छादित भाग असल्याने पर्यटकांना तो आकर्षित करतो. या भागात पुण्यातील 26 पर्यटकांनी नुकतीच भेट दिली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आलेल्या पर्यटकांमुळे स्थानिक नागरिक भारावून गेले होते. 

भारताने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर याठिकाणी काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर मच्छल सारख्या दुर्गम भागाला पुण्यातील पर्यटकांनी भेट दिल्यानंतर या भागाला पर्यटनासाठी नवीन आशेचा किरण निर्माण झाला आहे.

14 ऑक्टोबरला पुण्यातील 26 पर्यटक निसर्गरम्य मच्छल खो-यात दाखल झाले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आलेल्या पर्यटकांमुळे स्थानिक नागरिक भारावून गेले. पर्यटकांच्या स्वागतासाठी सगळा गाव एकत्र गोळा झाला होता. स्थानिकांनी पर्यटकांचे काश्मीरी पद्धतीने आदरातिथ्य केले. एवढंच नव्हे तर त्यांना स्वतःच्या घरातच रहायला जागा दिली.

मच्छल आणि पुशवारी या दोन्ही गावांतील नागरिकांनी आलेल्या पर्यटकांना आपल्या घरातच राहण्याची सोय केली. पर्यटकांसाठी नाश्ता, जेवण आणि काश्मीर पद्धतीची मेजवानी याची सोय केली होती. स्थानिकांनी दाखवलेलं प्रेम आणि आदर पाहून पर्यटक भारावून गेले, पर्यटकांनी देखील स्थानिकांना गोड पदार्थांचे वाटप केले.

या भागात पर्यटनासाठी मोठा वाव आहे, भारतीय सैन्य या भागात पर्यटनाला चालना मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. पर्यटन वाढल्यास येथील नागरिकांना उपजिवीकेचे चांगले साधन निर्माण होईल. भारत सरकारच्या विशेष प्रयत्नातून हे निश्चितच शक्य होऊ शकेल. पुण्यातून आलेल्या पर्यटकांमुळे या भागासाठी पर्यटनासाठी नवीन आशा निर्माण झाली आहे एवढं नक्की.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.