Pimpri : शहरातील बेवारस वाहने उचलणार ‘टोईंग व्हॅन’, मोशीत रिचवणार वाहने

25 लाखांचा खर्च, दोन एजन्सींची नियुक्ती, स्थायी समितीसमोर प्रस्ताव

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रस्त्यावर सोडून दिलेली आणि बेवारस वाहने महापालिकेच्या सहकार्याने पोलीस उचलणार आहेत. शहरात सुमारे तीन हजार बेवारस वाहने असून ही वाहने ‘टोईंग व्हॅन’द्वारे उचलली जाणार आहेत. मोशीतील कचरा डेपोच्या बाजूच्या महापालिका ताब्यातील जागेत बेवारस वाहने रिचविण्यात येणार आहेत.  दोन एजन्सीला विभागून हे काम दिले जाणार आहे. त्यासाठी 25 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आयत्यावेळी दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागातील रस्त्यावर वाहने सोडून दिले आहेत. अनेक बेवारस वाहने आहेत. ही वाहने नागरिकांना जाता-येता अडथळा निर्माण करतात.  पोलिसांच्या सर्वेमध्ये तब्बल अडीच ते तीन हजार बेवारस वाहने असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार महापालिकेने ही बेवारस वाहने उचलण्याकरिता ‘टोईंग व्हॅन’ वाहने पुरविणा-या संस्थांकडून दर मागविले होते. त्यामध्ये समीर एंटरप्रायजेस, महाराष्ट्र क्रेन सर्व्हिस, साई क्रेन सर्व्हिस आणि सिटी क्रेन सर्व्हिस या चार जनांनी दरपत्रक महापालिकेला सादर केले. त्यापैकी सर्वांत कमी दराचे साई क्रेन सर्व्हिस यांचे दर स्वीकारण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 24 जानेवारी रोजी मान्यता दिली. आयुक्तांच्या सुचनेनुसार समीर एंटरप्रायजेस, महाराष्ट्र क्रेन सर्व्हीसेस आणि सिटी क्रेन सर्व्हीसेस यांच्याकडे महापालिकेने निश्चित केलेल्या दराने काम करण्यास तयार आहेत का? अशी विचारणा केली.

त्यानुसार समीर एंटरप्रायजेस यांनी  4 फेब्रुवारीच्या पत्रानुसार महापालिकेचे अंतिम दर स्वीकारण्यास सहमती दर्शविली. तर, महाराष्ट्र क्रेन सर्व्हीसेस, सिटी क्रेन सर्व्हीसेस यांनी 6 फेब्रुवारी रोजी महापालिकेचे दर मान्य नसून दर कमी करण्याबाबत असमर्थता दर्शविली. महापालिका आयुक्तांच्या अधिकारात कमी दर असलेल्या साई क्रेन सर्व्हीसेस आणि समीर एंटरप्राजेस यांना बेवारस वाहने उचलण्याकरिता भाडेतत्वार स्वयंचलित टोईंग वाहने पुरविण्याचे काम विभागून देण्यात येणार आहे. त्यासाठी 25 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

…..किलोमीटर नुसार दिले जाणार पैसे

मोशीत बेवारस वाहने टाकली जाणार आहेत. तेथून  किती किलोमीटर अंतरावरुन वाहन उचलून आणले आहे. त्यानुसार साई क्रेन सर्व्हिसेस आणि समीर एंटरप्राजेस यांना पैसे देण्यात येणार आहेत.  पाच किलोमीटर वरुन चारचाकी उचलून आणल्यास 730 रुपये, दहा किलोमीटर 925 रुपये, 15 किलोमीटर एक हजार रुपये आणि 20 किलोमीटरवरुन उचलून आणल्यास एक हजार 370 रुपये देण्यात येणार आहेत. तर, दुचाकी पाच किलोमीटर 380 रुपये, दहा किलोमीटर 600 रुपये, 15 किलोमीटर 675 रुपये आणि 20 किलोमीटरसाठी 800 रुपये देण्यात येणार आहेत. या दोघांना विभागून काम दिले जाणार आहे.

याबाबत बोलताना सह शहर अभियंता श्रीकांत सवणे म्हणाले, ”पोलिसांच्या सर्व्हेनुसार आजमितीला अडीच ते तीन हजार बेवारस वाहने शहरात आहेत.  त्यामुळे प्राथमिकतेने बेवारस वाहने उचलण्याचे काम केले जाणार आहे. साई क्रेन सर्व्हिसेस आणि समीर एंटरप्राजेस यांना विभागून काम दिले जाणार आहे. मोशी कचरा डेपोच्या बाजूची सहा एकर जागा महापालिकेच्या ताब्यात आलेली आहे. टोईंग व्हॅनची यंत्रणा आणि जागा पोलिसांना दिली जाणार आहे. या जागेत गाड्या ठेवल्या जाणार आहेत. या कामावर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त आणि वाहतूक पोलिसांचे नियंत्रण असणार आहे.  गाड्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाची आहे. सरकारच्या आदेशानुसार महापालिका टोईंग व्हॅन आणि जागेची सोय करुन देत आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like