Pimpri: औद्योगिकनगरी स्वच्छ ठेवण्यासाठी शहरवासियांनी सहकार्य करावे – महापौर जाधव 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 22 लाखाच्या आसपास गेली आहे. शहर स्वच्छतेसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेमध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा. औद्योगिकनगरीला स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले. 

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व नगरविकास विभागातर्फे नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अर्बन अफेयर्स आणि इकले साऊथ एशिया यांच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिका व नगरपालिकांच्या अधिका-यांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेचे त्यांचे हस्ते उद्‌घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. नगरसेवक सागर गवळी, सहायक आयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश कडुसकर, शिरुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अॅलिस पोरे, नॅशनल इन्सिट्युट ऑफ अर्बन अफेयर्सच्याउमरा अनिस, आणि इकले साऊथएशियाच्या बेदो श्रुती सादुखान, निखिल कुलकर्णी, रितु ठाकुर आदी उपस्थित होते.

पिंपरी येथे सुरु असलेल्या तीन दिवसाच्या कार्यशाळेला संबोधित करताना महापौर राहूल जाधव म्हणाले, सर्वांनी एकत्र येऊन स्वच्छतेचे काम केले. तर, स्वच्छ भारत अभियानाला अधिक चालना मिळेल. आपला परिसर, आपले शहर स्वच्छ झाल्यास आपले राज्य, देश स्वच्छ होईल. प्रत्येक शहराच्या  लोकसंख्येवर तेथील घनकचरा व्यवस्थापन अवलंबून असते.

‘ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात माळरानाच्या जागा आहेत. त्यामुळे प्लॅस्टिक कचरा माळरानावर दिसून येतो. तो स्वच्छ करण्याला महापालिकेने प्राधान्य दिले आहे. उघड्यावर शौचाला बसल्यामुळे दुर्गंधी निर्माण होत होती. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांनी नागरीकांमध्ये जनजागृती निर्माण करून हागणदारीमुक्त शहर केले आहे. कचरा विलगीकरणा बाबत नागरीकांची जनजागृती करण्यात येत आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळा देण्याबाबत नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे’.

‘कार्यशाळेच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान विषयक कामकाजावर विचारमंथन होईल व नवनवीन संकल्पना निर्माण होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील घनकच-याचे व्यवस्थापन करण्यास मदत होईल’ असेही महापौर राहूल जाधव म्हणाले.

अतिरीक्त आयुक्त दिलिप गावडे म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड शहरात दररोज सुमारे 850 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2019  होणार असून त्यामध्ये अनेक पैलूंचा विचार केला जाणार आहे. मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होणारी ठिकाणे सुशोभित करण्यात येणार आहेत. नागरीकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा देणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका नागरीकांचे प्रबोधन करीत आहे. ओला व सुका कच-याचे विलगीकरण झाल्यास त्याची विल्हेवाट लावणे अधिक सुलभ होते’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.