Pune : शहरात देखील राबविणार टीपी स्कीम

एमपीसी न्यूज – शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी पुणे महापालिकेने नव्याने नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांमध्ये तसेच समाविष्ट होणाऱ्या प्रस्तावित गावांमध्येही ‘टीपी स्कीम’ राबविण्याची योजना आहे. बांधकाम विभागाने पालिका आयुक्त सौरभ राव यांना या बाबतची सविस्तर माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून नुकतीच दिली. त्यामध्ये ‘टीपी स्कीम’, केंद्र सरकारने घेतलेला निर्णय, योजनेचे फायदे आदी मुद्द्यांवर भर देण्यात आला होता. महानगर प्रदेश विकास प्राधिकरणापाठोपाठ (पीएमआरडीए) पालिकेनेही ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांमध्ये ‘टीपी स्कीम’ राबविणे शक्य आहे. तसेच नव्याने आणखी काही गावे पालिकेत समाविष्ट होणार आहेत. या गावांचाही विकास आराखडा तयार करण्यात येत असून ‘टीपी स्कीम’ राबविणे शक्य आहे. त्यासाठी ‘क्रिसेल’ या संस्थेने सादरीकरण तयार केले. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने ‘टीपी स्कीम’ आणि स्थानिक विकास आराखडा (लोकल एरिया प्लॅन) याविषयी स्वतंत्र धोरण तयार केले असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी निवडलेल्या देशातील 25 शहरांमध्ये पुण्याचा समावेश आहे. या शहरांमधील 50 ते पाचशे हेक्टर परिसरामध्ये प्रायोगिक स्वरूपात ही योजना राबविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.