Tata & TPG : टाटा मोटर्समध्ये ‘टीपीजी’ व इतर गुंतवणूकदारांची 7,500 कोटींची गुंतवणूक

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रयत्नांना गुंतवणूकदारांकडून पाठबळ मिळत असून टीपीजी राइज क्लायमेट आणि अन्य सह-गुंतवणूकदारांकडून 1 अब्ज अमेरिकी डॉलर (7,500 कोटी रुपये) उभारले जाणार आहेत. टाटा कडून मंगळवारी (दि.12) याबाबत जाहीर घोषणा करण्यात आली.

इलेक्ट्रिक वाहन व्यवसायाला चालना देण्यासाठी या निधीचा विनियोग नव्या उपकंपनीत केला जाणार आहे. या उपकंपनी मार्फत ई-मोटार मॉडेल बाजारात आणण्याची योजना आहे. एकंदर 2 अब्ज अमेरिकी डॉलर म्हणजे साधारण 16 हजार कोटी रुपये खर्चाची ही योजना आखण्यात आली असल्याचे टाटा मोटर्सने स्पष्ट केले.

टीपीजीसह, एडीक्यू या गुंतवणूकदार संस्थांकडून ही प्रस्तावित उपकंपनीत गुंतवणूक येऊ घातली असून, त्यांना या कंपनीत 11 ते 15 टक्क्य़ांच्या घरात भागभांडवली मालकी दिली जाणे अपेक्षित आहे. या प्रस्तावित कंपनीचे मूल्यांकन 9.1 अब्ज अमेरिकी डॉलर इतके अंदाजण्यात आले आहे.

टाटा मोटर्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले की, ‘भारत सरकारने निर्धारीत केलेल्या लक्ष्याप्रमाणे 2030 सालापर्यंत रस्त्यावर धावणाऱ्या 30 टक्के मोटारी या विद्युत शक्तीवर चालणाऱ्या असतील या उद्दिष्टाशी बांधिलकी दर्शवत वाटचाल सुरू केली आहे. कंपनीच्या या प्रवासात टीपीजी क्लायमेट राइज व अन्य गुंतवणूकदारांची सोबत मिळणे भाग्याचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.