Pune News : कृषी कायद्यांना व्यापारी, दलालांचा विरोध : गिरीश बापट 

एमपीसी न्यूज : देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठीचे तीनही कृषी कायदे रद्द होणार नाहीत. या कायद्यांना काही शेतकऱ्यांसह व्यापारी आणि दलालांचा विरोध आहे, अशी टीका पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांनी केली. पुणे विधानभवनात (कौन्सिल हॉल) एका बैठकीसाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

खासदार बापट म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी कायदे तयार केले आहेत. कुठल्याही परिस्थितीत हे कायदे रद्द केेले जाणार नाहीत याबाबत केंद्र सरकार ठाम आहे. परंतु राज्यातील सत्तारुढ पक्ष आणि केंद्रातील विरोधी पक्ष आणि डावे पक्ष शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम करू नये. या कायद्याचा उल्लेख काँग्रेस पक्षाने त्यांच्या जाहिरनाम्यात केला होता. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे देखील या कायद्यांसाठी आग्रही होते. परंतु केवळ भाजपाने हे कायदे केलेत म्हणून विरोध केला जात आहे.

शेतकरी शिष्टमंडळासोबत 11 वेळा बैठका घेतल्या पण निर्णय घेतला जात नाही. आता शरद पवार कायद्याविरोधातील आंदोलनात सहभागी होत आहेत. आमचं त्याबद्दल काही म्हणणं नाही पण देशातील सरकार अस्थिर करून अशांतता पसरविण्याचे काम काही पक्षांकडून केले जात आहे ते त्यांनी थांबवावे, शेतकऱ्यांच्या भविष्याशी खेळू नये, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच राज्यातील तीन पक्षांचे मिळून बनलेले सरकार जेव्हा पडेल तेव्हा पडेल, आम्ही पाडायच्या भानगडीत पडणार नाही. आम्ही मात्र पुढील पाच वर्षे जनतेसाठी सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत राहणार आहोत असा निर्वाळा बापट यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.