Pimpri News : मेट्रोच्या कामावरील क्रेन बंद पडल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज – मेट्रोच्या कामावरील क्रेन पीसीएमसी मेट्रो स्टेशन येथे काम सुरू असताना बंद पडले. त्यामुळे महामार्गावरील पुणे-मुंबई या बाजूची वाहतूक सेवा रस्त्याने वळवण्यात आली. यामुळे वल्लभनगर ते पिंपरी (अहिल्याबाई होळकर चौक) दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

शहरात फुगेवाडी ते पिंपरी दरम्यान ठिकठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. मेट्रोच्या कामासाठी ठराविक वेळेत रस्ता बंद करून वाहतूक वळवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु गुरुवारी (दि. 16) सकाळी साडेअकरा वाजले तरी एक क्रेन पुणे-मुंबई महामार्गावर उभे होते. महामार्गावर क्रेन उभा करून पीसीएमसी मेट्रो स्टेशनचे काम केले जात होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक खराळवाडी मधूनच सेवा रस्त्यावर वळवण्यात आली होती.

पीसीएमसी स्टेशन येथे क्रेन बंद पडले. त्यामुळे सकाळी उशिरापर्यंत क्रेन रस्त्यावरून हटविण्यात आले नाही. यामुळे वल्लभनगर पासून अहिल्याबाई होळकर चौक पिंपरी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. पिंपरी वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पिंपरी चौकातील सिग्नल काही वेळेसाठी बंद ठेऊन वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

पिंपरी चौक, अहिल्याबाई होळकर चौक आणि परिसरात मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पोल उभारण्याचे काम सुरू आहे. बीआरटीचे काम सुरू आहे. मेट्रोचे काम सुरू आहे. अशी अनेक कामे एकाच वेळी सुरू असल्याने अगोदरच या भागात वाहतूक कोंडी होते. त्यात महामार्गावर क्रेन बंद पडल्याने एक लेन वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. त्याचा ताण सेवा रस्त्यावर आला. यामुळे वाहतूक कोंडीत आणखी जास्त भर पडली.

पिंपरी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे म्हणाले, “मेट्रोच्या कामासाठी ठराविक वेळेत वाहतूक वळवण्यासाठी परवानगी आहे. मात्र आज सकाळी बराच वेळ क्रेन महामार्गावर लावण्यात आले होते. मेट्रोकडून प्रत्येक कामाचे स्वतंत्र कंत्राट, उपकंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही काही जणांशी संपर्क साधला. परंतु ते आमचे काम नाही अशी त्यांच्याकडून उत्तरे मिळाली. मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी बोलून क्रेन हटविण्यास सांगितले असून वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.”

दरम्यान, महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे म्हणाले, “पीसीएमसी मेट्रो स्थानकाजवळ काम करत असताना एक क्रेन अडकल्याची घटना घडली आहे. मेट्रोचे ट्राफिक मार्शल वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. क्रेन दुरुस्त करून काढण्यात आले आहे. वाहतूक देखील सुरळीत करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी संबंधित कंत्राटदाराला सर्व मशीन सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.