Aundh : डॉ.  बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात कागदी पिशवी बनविण्याचे प्रशिक्षण

एमपीसी  न्यूज –   औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात  कागदी पिशव्या बनविण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी खादी ग्रामोद्योग शिवाजीनगर येथील प्रशिक्षक  सुधाकर सपकाळ आले होते. उद्योजकता विकास विभागाच्या चेअरमन  प्रा.नलिणी  पाचर्णे, आय. क्यू. ए.सी. विभागाच्या चेअरमन डॉ. सविता पाटील, डॉ. हर्षद जाधव,  प्रा. सुप्रिया पवार,  डॉ. अतुल चौरे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की,  प्लास्टिकच्या वस्तूंना पर्याय देण्यासाठी आमची ग्रामोद्योग संस्था कार्य करीत आहे. तसेच पर्यावरणपूरक वस्तू बनवल्यास  निसर्गाचा समतोल बिघडणार नाही. अलीकडे प्लॅस्टिकची पिशवी वापरायला बंदी असल्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशवीला पर्याय म्हणून कागदी पिशवीचा वापर सर्वांनी केला पाहिजे. तरच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबेल.

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या की,  विद्यार्थ्यांना कौशल्ययुक्त ज्ञान मिळावे. प्लास्टिकला पर्याय म्हणून कागदी पिशवी बनविण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांने आत्मसात केल्यास,  विद्यार्थ्यांना छोटा-मोठा उद्योग – व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. उद्योग व्यवसाय करण्यासाठी खऱ्या अर्थाने हेच वय आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सुरु करायचे असतील त्यांच्यासाठी रयत शिक्षण संस्थेने जिल्हा उद्योग केंद्रासोबत एमओयु  केला आहे.  त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसायासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आर्थिक मदत मिळवून दिली जाईल. विद्यार्थ्यांनी  छोटा-मोठा उद्योग-व्यवसाय करून प्रामाणिक  मार्गाने पैसा मिळवावा. तसेच कष्ट करून मोठे व्हावे असा सल्ला दिला. ही कार्यशाळा उद्योजकता विकास विभागामार्फत घेण्यात आली. त्याचबरोबर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर  मॉडन कॉलेज येथील विद्यार्थ्यांनीही या कार्यशाळेत सहभाग घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.