PCMC News : वसुलीच्या कामामुळेच मावळते आयुक्त राजेश पाटील यांची बदली; खासदार श्रीरंग बारणे यांचा गंभीर आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत दीड वर्षाच्या कारकिर्दीत विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या मावळते आयुक्त राजेश पाटील यांना ठेकेदार, बिल्डरांशी सलगी भोवली आहे. दोन वर्षात ठोस कोणतेही काम केले नाही.बिल्डरच्या विळख्यात अडकले होते.हाताखालील अधिकारी वसुलीच्या कामात गुंतले होते.त्यामुळेच राजेश पाटील यांची बदली झाल्याचा गंभीर आरोप मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केला.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात राजेश पाटील यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली होती.आयुक्त पाटील यांचे सुरुवातीपासूनच लोकप्रतिनिधी, पदाधिका-यांशी खटके उडायला लागले.आयुक्त महाविकास आघाडीतील घटक पक्षातील लोकप्रतिनिधींचेही ऐकत नव्हते. त्यांनाही दाद देत नव्हते.नगरसेवकांनाही भेटण्यासाठी वेटिंगवर थांबविले जात होते.गावच्या पाटलासारखा आयुक्तांचा कारभार सुरु होता.त्यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये संताप होता.

प्रत्येक निर्णय तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांना विचारुनच आयुक्त पाटील घेत होते. अजितदादा बोले अन् आयुक्त डोले अशी परिस्थिती होती.आयुक्तांच्या या एक कल्ली कारभारावर शिवसेना खासदार श्रीरंग बारणे तीव्र नाराज होते.कोणतेही काम वेळेत करत नव्हते.दप्तर दिरंगाईमुळे खासदार तीव्र नाराज होते. राज्यात सत्ता बदल होताच खासदार बारणे यांनी आयुक्तांची बदली करण्यासाठी आपले वजन वापरले.आयुक्त पाटील यांच्या कार्यपद्धतीबाबत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली.आयुक्तांचे पराक्रम मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले.त्यावेळी चांगला अधिकारी शहराला देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी खासदार बारणे यांना दिली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या विश्वासाने शेखर सिंह यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली.शहर विकासाला गती मिळावी यासाठी तरुण, तडफदार शेखर सिंह यांची आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिशय विश्वासू अशी शेखर सिंह यांची ओळख आहे.मुख्यमंत्री शिंदे, खासदार श्रीरंग बारणे आणि नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांची मुंबईत बैठकही झाली.शहर विकासाला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

बिल्डरांशी सलगी भोवली ?

राजेश पाटील लोकप्रतिनिधींचे काम ऐकत नव्हते.केवळ चमकोगिरी करत होते.मंत्रालयातून सांगितले तरी ऐकले जात नव्हते. त्यांचा केवळ चमकोगिरीवर भर होता.कोणतेही काम वेळेत करत नव्हते. त्यांचे ठेकेदार, बिल्डरांशी थेटपणे लागेबांधे होते.पाटील यांच्या बदलीची चर्चा सुरु झाल्यावर बिल्डरांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी संपर्क साधला होता.तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बिल्डरांनी संपर्क साधला.पण, फडणवीस यांनी खासदार बारणे यांनी आयुक्त पाटील यांची बदली केल्याचे सांगितले.त्यामुळे बिल्डरांची बोलतीच बंद केली.आयुक्तांची बदली होणार असल्याचे बिल्डरांना दु:ख होण्याचे कारण काय असा सवाल राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.

खासदार बारणे म्हणाले, मावळते आयक्त राजेश पाटील  यांनी दोन वर्षात ठोस कोणतेही काम केले नाही. बिल्डरच्या विळख्यात अडकले होते. हाताखालील आधिकारी वसुलीच्या कामाला लागले होते.राजकिय दबावाला बळी पडून ठराविक बांधकामावर कारवाई केली. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडू शकले नाहीत.शहरात पाणी समस्या कायम आहे.  नदी सुधार प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले.नव्या डेव्हलपमेंट प्लॅनकडे दुर्लक्ष, शहरातील उद्यानाकडे दुर्लक्ष,  मर्जीतील आधिकाऱ्यांकडे विशेष महत्वाची जबाबदारी दिली. या चुकीच्या कामामुळेच पाटील यांची बदली झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.