‘मस्ट सी’ डेस्टिनेशन न्यूयॉर्क

(अमृता मोघे)

एमपीसी न्यूज- तात्पुरता का होईना पण या शहराला मी सध्यातरी माझं शहर म्हणू शकते. तीन वर्षांपूर्वी मी माझ्या नवऱ्याच्या बदलीमुळे न्यूयॉर्कमध्ये आले आणि त्याच्या प्रेमात पडले. जगभराच्या ट्रॅव्हलर्सच्या लिस्ट मधलं ‘मस्ट सी’ डेस्टिनेशन आणि नुसत्या नावानेच भुरळ घालणारं असं हे झगमगतं न्यूयॉर्क. आपल्याकडे कसं, दिल्ली राजधानी असली तरी ग्लॅमर मात्र मुंबईला. तसं आहे न्यूयॉर्कचं . पण हे शहर म्हणजे फक्त ग्लॅमर नाही. त्या बरोबर नावीन्य, कर्तुत्व, बेहोशी,वैविध्य, जोश यांचा एक सुंदर केऑस. या शहराला स्वतःची एक लय आहे, ठेका आहे. तुम्ही या शहरात येता आणि ते तुम्हाला अगदी झपाटून टाकतं.

अमेरिका मोठी, समृद्ध, जगाची महासत्ता. पण या देशाला तसा इतिहास नाही. जुना म्हणजे फार तर दोनशे वर्षांपूर्वीचा. त्यामुळे लिंकन, वॉशिंग्टन, मार्टिन लुथर किंग अशा महापुरुषांच्या कर्तृत्वाचे कवडसे सोडल्यास, अमेरिकन शहरं कोरी वाटतात. थोड्याफार फरकानं ही शहरं दिसतात पण एक सारखीच. म्हणजे शिकागो आणि मायामी डाउनटाउन दिसतील तशी सारखीच, फरक फक्त स्केलचा असतो आणि तिथ राहणाऱ्या लोकांचा. त्यामुळे युरोप कसा तुम्हाला इतिहासाने वेडं करतो, सौंदर्याने मंत्रमुग्ध करतो, या बाबतीत अमेरिका मला थोडं निराश करते. पण हे लँड ऑफ फ्री आहे. नेटिव्ह अमेरिकन्सना जवळ जवळ नाहीसं करून या यूरोपवासियांनीच या देशाचा पाया रचला फ्रीडम वर. फक्त शोकांतिका ही की त्यांच्या फ्रीडमसाठी इथल्या खऱ्या भूमिपुत्रांना कायमचं फ्री व्हावं लागलं किंवा बंदिस्त तरी. ते स्वतःच्या मातीला पारखे झाले. असो, नव्या फ्री वर्ल्ड मध्ये अमेरिकन फ्रीडम हा बेंचमार्क झाला. ट्रम्पमुळे या फ्रीडमला बारीक तडा गेला असला तरी याच ट्रम्पबद्दल स्वतः एक इमिग्रंट असलेला ट्रेवोर नोआह, त्याची नॅशनल टेलिव्हिजनवर यथेच्छ निंदा नालस्ती करू शकतो आणि तरीही बिनधास्त पणे इथे राहू शकतो, हे आहे इथलं खरं फ्रीडम. पण काही वेळा हे फ्रीडम मला बुचकळ्यात टाकतं. गनला नाही म्हणणं म्हणजे स्वातंत्र्यावर गदा हे काही माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला पटत नाही. असो, आपण या देशाचे पाहुणे. यजमानांचं सगळंच कुठे पटतं पाहुण्यांना!!

असं सगळं असलं तरी न्यूयॉर्कची मजाच वेगळी. न्यूयॉर्क कोरं नाही. कुठल्याही महापुरुषांनी इथे रंग भरले नाहीत आणि तरीही सामान्यांच्या बोल्ड आणि डायनॅमिक स्ट्रोक्सनी या शहराला एक मास्टरपीस बनवलं. हे शहर म्हणजे लँड ऑफ फ्रीचं जिवंत उदाहरण आणि बाकी अमेरिकेपेक्षा खूप वेगळं. मुंबई सारखं फक्त ग्लॅमरच नाही तर त्याचं जुळं भावंड वाटावं इतकी ही शहरं मला सारखी वाटतात. न्यूयॉर्क मुंबईसारखं बंदर, देशाचं फायनान्शिअल कॅपिटल, सतत धावणारं, कमालीचं डायव्हर्स आणि तरीही या शहराला आपल्या मुंबईसारखंच खरं कॅरेक्टर देतात ती इथली माणसं.

किती धर्म, किती भाषा, किती रंगाची ही माणसं! बरीच लोकं जगाचा कानाकोपऱ्यातून वॉर झोन मधून, एक मुक्त सुरक्षित आयुष्य जगायचं स्वप्न घेऊन या शहरात आलेली असतात, तर काही जण फक्त मुक्तपणे आपल्या स्वप्नांचा मागे धावायला. प्रत्येकाची सुख दुःख वेगवेगळी, पण ते मुक्तपणे व्यक्त करायचं फ्रीडम देतं हे शहर अगदी आपल्या मुंबई सारखं. मुंबई हा भारताचा कॅलिडोस्कोप आहे तर न्यूयॉर्क जगाचा. इथे प्रत्येक माणसाला स्वतःचा असा एक स्वर आहे आणि तरीही त्यात एक सिम्फनी आहे.

न्यूयॉर्क खरं तर पाच बोरोजचं. मॅनहॅटन, ब्रूकलीन, ब्रोंक्स, क्विन्स आणि स्टेटन आयलंड. पण डोळ्यासमोर जे न्यूयॉर्क येतं ते म्हणजे फक्त मॅनहॅटन. मॅनहॅटन स्क्रेपर्सचं, वॉल स्ट्रीटचं, टाइम्स स्क्वेअरचं, सेंट्रल पार्कचं, वर्ल्ड ट्रेड सेंटरचं, एंपायर स्टेटचं आणि ब्रूकलीन ब्रीजेचं. या तीन वर्षात अनेक वेळा इथे सगळीकडे फिरले पण तरीही प्रत्येक वेळेला गेलं की एक नवी बाजू, नवा पर्स्पेक्टिव्ह असतो या शहराला. दर वेळेस नवीनच शहर असतं हे. या शहराला ऋतूही चार ठळक. स्प्रिंगमध्ये चेरी ब्लॉसम नि फुललेलं, तर समरमध्ये अनेक रंगीबेरंगी फुलांनी आणि हिरव्यागार झाडांनी बहरलेलं, फॉलमध्ये लाल, पिवळ्या रंगाच्या पॅलेट मधल्या सगळ्या छटांनी नटलेलं आणि थंडी मध्ये शुभ्र बर्फाच्या दुलई मध्ये लपलेलं. जागा त्याच असतात पण बाज मात्र वेगळा असतो प्रत्येक ऋतूत.

ब्रूकलिन ब्रिज हा माझा सगळ्यात आवडीचा. हा ब्रिज हँडसम आहे, अतिशय फोटोजेनिक आहे. याच्या पोटातून भरधाव वेगानं वाहनं जातात आणि डोक्यावरून आपण चालत असतो. ब्रिजच्या व्हियूइंग डेकवरून ईस्ट रिवरच्या मोठ्या पात्रामध्ये पडलेल्या प्रतिबिंबात या मॅनहॅटनचं चमकतं विश्व एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतं. हा एक मिलियन डॉलर व्हियू आहे. या शहराचा.आपल्या शाहरुखानी तर हा ब्रिज इतका रोमँटिक करून टाकला आहे कि न्यूयॉर्क मधल्या रोमॅन्ससाठी दुसरा कुठलाही बॅकड्रॉप इतका सुंदर दिसू शकतो असं वाटतच नाही. फक्त हा ब्रिज किंग खानला त्याची सिग्नेचर रोमँटिक पोझ देण्यासाठी रिकामा होता पण आपल्याला मात्र लोकांना आणि सायकलस्वरांना चुकवत पार करावा लागतो.कायम हा गजबजलेला, आणि टुरिस्टनी फुललेला असतो.

हा ब्रिज जितका उत्साह देतो आपल्याला तितकच ९/११ मेमोरियल चटका लावून जातं मनाला. मुंबईचं ताज हॉटेल या बाबतीत आपल्याला जास्ती जवळचं. तिथल्या बंदुकीच्या गोळ्यांचे मार्क्स बघितल्यावर मन खिन्न होतं, भीतीने शहारा येतो आणि इथे तर जी एकेकाळी न्यूयॉर्कची शान होती अशी एक भव्य वास्तु सगळ्यांच्या डोळ्यांदेखत जमीनदोस्त झालेली आणि त्याच्याबरोबर काळाआड गेले अनेक न्यूयोर्कर्स. न्यूयॉर्करांसाठी अजूनही ही ओली जखम आहे. माझ्या अमेरिकन मित्र-मैत्रिणींपैकी कोणाचं अगदी जवळचं तर काहींचं दूरच्या ओळखीचं तिथे अघटित गेलेलं. अमेरिकन माणूस हळवा होतो इथे. दगडी चौथऱ्यावर कोरलेल्या नावांपुढे त्यांच्या जिवाभावाचा माणूस एखाद फुल ठेवतो किंवा छोटा अमेरिकन झेंडा रोवतो. दोन अश्रू तो दगड ओला करतात .काही जिवलगांना तर त्यांच्या माणसांचा कधी ठावठिकाणा कळलाच नाही. त्यांना इतक्या वर्षांनीही क्लोजर नाही. ती नावं त्यांना किती जवळची वाटत असणार.

आपल्या जिवाभावाच्या व्यक्तीचा शेवटचं दर्शन न मिळणं यापेक्षा मोठं शल्य ते काय? कुठेतरी आपल्याला पण हा सल जाणवतो,आपलेही डोळे भरून येतात.पण डब्ल्यूटीसी हे भावनांचे रोलर्कॉस्टर आहे. एकीकडे आपल्याला असं हळवा करतो आणि पुढच्या मिनिटाला समोर मान मोडेपर्यंत वर बघायला लावणाऱ्या ‘वन वर्ल्ड ट्रेड सेंटर’ कडे बघितलं की वाटतो तो फक्त अचंबा आणि माणसाची चिवटपणे परत उभं रहायची वृत्ती. ही वस्तू आपल्याला भाराऊन टाकते हे नक्की.

न्यूयॉर्क सबवे नी जाणं ही मला अजून एक आवडणारी गोष्ट. बऱ्याच न्यूयॉर्कर्सना हे आवडत नाही. न्यूयॉर्क सबवे बरीच जुनी. काही स्टेशनं स्वच्छतेबाबतीत इंडियातल्या स्टेशनांनां लाजवतील इतकी घाणेरडी. अशा स्टेशनांवर होमलेस लोकं वस्तीला, त्यामुळे कुबट वास, घाण. पण काही स्टेशन अगदी उलट. चकाचक, मॉडर्न. पण स्टेशनां पेक्षा भारी रंगीत तिथली माणसं. सगळ्या प्रकारची लोकं इथे. चायनीज मध्यमवयीन काकू आपल्या पिशव्या घट्ट धरून बसलेल्या, गुलाबी रंगाचे केस असलेली टीनेजर कानात हेडफोन आणि तोंडात गम चघळत मोबाईलमध्ये डोकं घातलेली, एखादा आफ्रिकन माणूस कानातल्या हेडफोन्स वर वाजणाऱ्या म्युझिकच्या तालावर मानेनी नाचणारा, वॉल स्ट्रीट वर काम करणारे एकदम अपटूडेट तरुण-तरुणी, हातात नकाशे दिसले किंवा चेहऱ्यावर “माझं स्टेशन गेलं तर नाही ना “ हा भाव दिसला की समजायचं एकतर टुरिस्ट किंवा सबवे क्वचित वापरणारे. मी त्या दुसऱ्या गटात.

एखादं सोनेरी केसांचं गुटगुटीत बाळ त्याच्या बेबी कॅरियरमध्ये बसून आपल्याकडे बघत हसणारं, गप्पात रंगलेल्या मैत्रिणी, पुस्तकात रमलेला मोहक तो, किती चेहरे या सबवेला. सगळेच भावतात मला. मोठ्या स्टेशनांवर बरेच वेळा कुणीतरी काहीतरी गात असतं, वाजवत असतं. ज्यांना आवडतं त्यांची पावलं तिथे थबकतात, काही मुक्तजीव तर त्यावर बिनधास्तपणे नाचतात. दोन पाच डॉलर त्या कलाकारांना मिळतात. बाकी धावतं विश्व त्यांच्या दुनियेत असतं.

न्यूयॉर्क मध्ये कुठेही चालत सुटा, सगळीकडे सुंदर आकर्षक स्टोअर्स आणि त्यांच्या अतिशय कल्पक डिस्प्ले विंडोज, असंख्य रेस्टॉरंट, कॅफेज, डेलीज आणि त्यांच्या जोडीला फूड ट्रकस . खाऱ्या दाण्यांपासून बेल्जियन वॉफल्स पर्यंत सगळं मिळतं या ट्रक्सवर. थंडीत सिटी मध्ये गेलं कि चालताना आपला पुढचा माणूस एखाद्या कॅफेत शिरतो आणि दरवाजा उघडल्यावरचा कॉफीचा दरवळ आपल्यालाही हवा हवासा वाटतो. न्यूयॉर्क मध्ये येऊन मी बरीच वेगवेगळी क्यूजिन्स चाखली.

शाकाहारी असल्यामुळे अगदी सगळं खाता येतं असं नाही पण माझ्या चौकटीत बसणारा बरच काही खाल्लं. सगळ्यांना जोडणारा किती मोठा दुवा हा. अफगाण कबाब खाताना अमेरिकन्सना ओसामा आठवत नाही आणि मेक्सिकन टॅकोज खाताना वॉल आठवत नाही. जिभेचा चोचल्यांपुढे सगळे धर्म आपले होतात. मुंबईशी साधर्म अजून एका गोष्टीत आहे. इथे दोन डॉलरचा हॉट डॉग ही मिळेल आणि दोनहजार डॉलरचं फाईन डायनिंग रेस्टॉरंट पण सापडेल. प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशी सोय आहे. किती खर्च करायचे ते तुम्ही ठरवा.

संधिप्रकाशात टाइम स्क्वेअरला जाणं हा न्यूयॉर्क बघण्या मधला सर्वात रोमांचक अनुभव आहे. डोळे दीपवणारी रोषणाई, मोठ्ठे इलेक्ट्रॉनिक बिलबोर्डस आणि त्यावर चालू असलेल्या जाहिराती, विविध आवाज, कॅमेऱ्यांचे फ्लॅश, पोज करणारे टुरिस्ट, पोलिसांच्या गाड्या ,कॅरेक्टर ड्रेस केलेले मिनी, मिकी, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, आणि कायम आफाट गर्दी. इथे आपण हरवू की काय असं वाटतं आणि मग त्या पाहिऱ्यांवर बसलं की मला हे धावतं विश्व स्लो-मोशनमध्ये दिसायला लागतं. टाइम स्क्वेअर ही एक धुंदी आहे. ही जागा खरंच जगाचा मेल्टिंग पॉट आहे. साडी नेसणाऱ्या काकू असोत नाहीतर अल्ट्रा मिनी स्कर्ट मधली रशियन तरुणी असो, दोघींच्या तोंडून इथे आल्यावर पहिले फक्त “वॉव” चं निघणार . शब्द वेगळे असले तरी भावना अगदी त्याच. वेगळीच वाईब आहे इथे. वेगळ्याच विश्वात असतो आपण इथे.

न्यूयॉर्कच्या टॉप व्हियू तीन बिल्डींग्स देतात – डब्लूटीसी, एम्पायर स्टेट किंवा रॉकफेलर. माझं आवडतं रॉकफेलर. रॉकफेलर वरून पाहिलेलं न्यूयॉर्क म्हणजे या शहराचा फिश बोल व्हियू – वियुइंग आऊट साईड फ्रॉम इन साईड. समोर एम्पायर स्टेट एखाद्या सजलेल्या विंटेज राणी सारखी दिमाखात उभी असते आणि त्याचा मागे डब्लूटीसीचा या काळाचा स्वॅग तिच्याशी स्पर्धा करत असतो. लेडी लिबर्टी चा छोटासा ठिपका क्षितिजा पर्यंत पसरलेला हा कॅनवास पूर्ण करतो. त्या उंची वरून बाजूच्या ७०-८० मजली स्कायस्क्रॅपर्स ठेंगण्या वाटू लागतात.सगळं शहर तुमच्या आसपास सुंदर पसरलेलं असतं. संध्याकाळच्या वेळेस तर हे शहर एखाद्या गॅलेक्सी सारखे दिसतं इथून. लाइट्स आणि फक्त लाइट्स सगळीकडे.

या स्कायस्क्रॅपर्सच्या जंगलात हिरवंगार सेंट्रल पार्क मनाला तजेला देतं. न्यूयॉर्कच एमराल्ड ओयासिस आहे ते. गर्द दाट मॊठ्या झाडांचा सावलीत इथल्या सुंदर मखमली हिरव्या लॉन्स वर आडवं पडून आपलं आवडतं पुस्तक वाचायची मजा काही औरच. बरेच न्यूयॉर्कर्स इथे समर मध्ये पिकनिक बास्केट्स आणतात आणि दिवसभर इथे घालवतात. एरवी जॉगर्स साठीचं हे नंदनवन. या शहरात असंख्य म्यूज़ीअमस आहेत -नॅच्युरल हिस्टरीपासून ते गुगेनहाइम पर्यंत, प्रत्येक जोनेरचं. ही सगळी म्यूज़ीअमस बघायची असतील तर महिना कमी पडेल.

रॉकफेलर वरून दिसणाऱ्या लेडी लिबर्टीचा बारीक ठिपका बॅटरी पार्क हुन हडसन नदीच्या पात्रातून निघालेल्या फेरीवरच्या डेक वरून हळू हळू भव्य व्हायला लागतो. लेडी लिबर्टी पेक्षा या आयलँड वरून मॅनहॅटन खूपच सुंदर दिसत. हडसनच्या पलीकडीलं हे झगमगतं शहर आकाशाशी स्पर्धा करतं . चेल्सी मार्केट मधलं रस्टिक बोहो हाय लाईन, किंवा सोहो किंवा ग्रीनविच व्हिलेज मधला फेर फटका, इथे इतकं बघायला आणि अनुभवायला असतं कि पाय थकतात पण डोळे अजून नवीन काहीतरी शोधत असतात , बघत असतात. या जगाला फ्रीडमचा एक नवा अर्थ या शहराने दिला. पूर्वी आलेले आयरिश, इटालियन, ज्युईश ,जर्मन किंवा आता आता आलेले भारतीय, चायनीज, मेक्सिकन असो , या सगळ्या कल्चर्स ना न्यूयॉर्कनी आपलंसं केलं. लिबर्टी बाईंच्या मशालीने बरीच आयुष्य उजळून निघाली. आणि म्हणूनच इथे भारतीयांना दिमाखात मोठी इंडिपेन्डेन्स डे परेड काढता येते किंवा एम्पायर स्टेट १५ ऑगस्टला आपल्या तिरंगी झेंड्यात उजळून निघते.

काही दिवसांपूर्वी पुलंचं अपूर्वाई खूप वर्षांनी परत वाचलं . लंडन पॅरिस या शहरांचे जे अर्थ त्यांनी उलगडले त्याला तोड नाही. आपण ही बघतो तेच सगळं, पण पुलंना दिसतं. आणि जे दिसतं ते मांडायचं सामर्थ्य फक्त त्यांच्या लेखणीला. ते वाचून राहून राहून वाटतं पुलं न्यूयॉर्कला आले असते तर या शहराचा एक नवा अर्थ त्यांनी समजावला असता. त्यांनाही या शहराने भुरळ घातली असती कारण त्यांना शहरांपेक्षा शहरातल्या माणसांचं जास्ती कौतुक. या गर्दीत एखादा अमेरिकन नाथा कामत, एखाद्या चायनीज बाबली बाई किंवा इटालियन पेस्तन काका नक्कीच सापडले असते त्यांना. कदाचित मराठी साहित्य ‘दक्षिणरंगा’ नी समृध्द झालं असतं .

या शहराने मला बराच काही दिलं. माझी क्षितिजं रुंदावली पण चंगळवादाची सीमाही दाखवली, जगाचं दुसरा टोक त्यांनी मला दाखवलं, नवीन माणसं जोडली. सगळंच काही चांगलं नाही इथलं पण जे चांगलं आहे ते घेण्यासाठी माझी ओंजळ उघडी आहे. पुढेमागे नवीन वाटा खुणावतील, न्यूयॉर्कला मागे टाकण्याची वेळ येईल कदाचित पण या शहराचं भरभरून जगणं, त्याचा नखरेलपणा, त्याची चव आणि त्याची रंगीबेरंगी माणसं माझं जगणं कायमचं समृद्ध करतील हे नक्की.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.