Chinchwad : वाहतूक विभागाच्या विशेष मोहिमेत नियमभंग करणा-या वाहनचालकांकडून 50 दिवसात 18 लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने एक जानेवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत विशेष मोहीम राबवली. या कालावधीत 10 हजार 856 वाहनांची तपासणी करत नियमभंगाचा दंड असणा-या चार हजार 211 वाहन चालकांकडून 17 लाख 94 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविल्यामुळे अनेक अपघात होतात. नियमभंग करताना आढळणा-या वाहनांवर वाहतूक विभागाकडून ऑनलाईन चलन केले जाते. पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडून देखील यावर जोर देण्यात आला आहे. ऑनलाईन चलन केल्यानंतर त्याची वसूली करणे देखील पोलिसांना त्रासदायक आहे. नियमभंग केल्याचा दंड वसूल करण्यासाठी वाहतूक विभागाने एक जानेवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत विशेष मोहीम राबवली.

विशेष मोहिमेत वाहतूक पोलिसांनी 10 हजार 856 वाहनांची तपासणी केली. त्यातील चार हजार 277 वाहनांवर दंड असल्याचे आढळून आले. त्यातील चार हजार 211 वाहन चालकांकडून दंडाची 17 लाख 94 हजार 500 रुपये रक्कम वसूल करण्यात आली. त्याचबरोबर दंड न भरलेल्या वाहन चालकांवर जानेवारी महिन्यात 31 आणि फेब्रुवारी महिन्यात 26 जणांचे लायसन्स जमा करण्यात आले आहेत. एक वाहन देखील पोलिसांनी जप्त केले आहे.

“वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. वाहतूक विभागाच्या विशेष मोहिमेदरम्यान जास्तीत जास्त वाहने तपासून ऑनलाईन दंड तपासला जाणार आहे. दंड असल्यास तात्काळ वसूल करून घेतला जाणार आहे. दंड न भरल्यास चालकाचा परवाना, वाहन जप्त करून खटला दाखल करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक (नियोजन) प्रसाद गोकुळ यांनी सांगितले आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like