अनुपम सृष्टिसौंदर्याने नटलेले मेघालय (भाग 3)

एमपीसी न्यूज- लैट्रेनगुई (Laitryngew) या गावातील एका शाळेमध्ये आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. एका वर्गामध्ये पुरुष मंडळींची तर दुसऱ्या वर्गामध्ये महिलांची. या ठिकाणी पोचल्यानंतर गरमागरम वाफाळलेला दूध घातलेला चहा आणि पॅटिस मिळाले. ही शाळा गावापासून जरा लांब एका माळरानावर होती. संध्याकाळचे पाच वाजले होते. दिवस मावळला होता. मग आम्ही शाळेच्या मैदानात शेकोटी करून गाणी, अंताक्षरी खेळून धम्माल केली. वेगवेगळ्या प्रांतांमधून आलेले, एकमेकांना अपरिचित असलेले आम्ही एका दिवसात एकमेकांच्या चांगल्या परिचयाचे झालो. ट्रेकचा असा फायदा होतो. विविध प्रकारचा स्वभाव असलेल्या माणसांमध्ये राहण्याचा अनुभव मिळतो. मात्र ट्रेकमध्ये नेहमी स्वतःच्या काही सवयी असतील तर त्या बाजूला ठेवाव्या लागतात. कुणाला सकाळी चहा प्यायल्याशिवाय प्रातर्विधी होत नाही, कुणाला ठराविक वेळेतच नाश्ता लागतो असे चोचले ट्रेकमध्ये करून चालत नाहीत. नाहीतर त्याचा तुम्हाला आणि इतरांना त्रास होतो. ट्रेकमुळे आहे त्या परिस्थितीमध्ये राहण्याची सवय लागते, कुणावाचून अडत नाही.

सगळ्यांना झोपण्यासाठी स्लीपिंग बॅग देण्यात आल्या होत्या. मध्यरात्री मुद्दाम उठून शाळेच्या मैदानात उभा राहून आकाशाकडे पहिले तर संपूर्ण आकाश चांदण्याने गच्च भरून गेले होते. आकाशात चंद्र नव्हता. म्हणूनच कदाचित या चांदण्या आपल्या पूर्ण शक्तीनिशी प्रकाशमान झाल्या होत्या. कारण पृथीतलावर प्रकाश देण्याची त्यांच्यावर जबाबदारी होती. हे दृश्य मी डोळ्यात साठवून ठेवत होतो. पुण्यात शहरातील दिव्यांच्या प्रकाशामुळे असे चांदणे कधी पाहायलाच मिळत नाही. पण या ठिकाणी सर्वत्र काळोख असल्यामुळे लहान मोठ्या, चांदण्या, ग्रह-तारे, सप्तर्षीचा तो पतंग स्पष्टपणे दिसत होते. काही ठिकाणी विरळ तर काही ठिकाणी एकमेकांना खेटून असंख्य चांदण्याचा पुंजका दिसत होता.

सकाळी आठ वाजता पुन्हा एकदा ट्रेकर्सची मोजणी झाली आणि आम्ही पुढच्या मोहिमेवर निघालो. आज धबधबे पाहण्याचा दिवस होता. सहा ठिकाणच्या धबधब्यांना भेटी देण्याचा कार्यक्रम होता. सहापैकी दोन धबधबे अत्यंत प्रेक्षणीय होते. बाकीचे वाटेत आले म्हणून पहिले. साधारणपणे पाच सहा किमी चालल्यानंतर एका छोट्याशा धबधब्याजवळ आलो. या धबधब्यावरून पाणी वाहत नव्हते. मात्र साठलेले नितळ स्वच्छ पाणी पाहून मन हरखून गेले. पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. स्वच्छ हातपाय धुतले, त्या थंडगार पाण्यात चेहरा बुडवून श्वास रोखण्याचा प्रयत्न केला. दहा सेकंदातच चेहरा गारठून गेला. पाण्यात पाय सोडून बसल्यावर सगळं शीण निघून गेला. एका ठिकाणी तलावामध्ये स्थानिक पर्यटक आपल्या कारमधून आलेले होते. मासेमारीसाठी पाण्यात गळ टाकून बसले होते. एखादा गलेलठठ मासा घावला की लगेच चुलीवर मच्छी फ्राय ! मी मत्स्यप्रेमी नाही पण आमच्यापैकी काहीजण ते दृश्य पाहून जिभल्या चाटत जात होते.

पहिला सुंदर धबधबा पहिला तो म्हणजे लिंगसियार (Lyngksiar falls) दोन टप्पे असलेला धबधबा आम्ही गेलो त्यावेळी पूर्ण क्षमतेने वाहत नव्हता पण या ठिकाणी साठलेले निळसर स्वच्छ पाणी नजरेला थंडावा देत होते. काहीजणांनी या पाण्यात मनसोक्त स्नान केले. मेघालयमध्ये पाहिलेले पाणी या विषयावर वेगळे वर्णन करावे लागेल. स्वच्छ, कोणतीही घाण नसलेले नितळ, पारदर्शी पाणी हे मेघालयचे वैशिष्ट्य. ‘पानी रे पानी तेरा रंग कैसा ?’ असे आपण विचारतो, पण मेघालयच्या जलाशयाला निळसर हिरवा, थोडासा मोरपंखी रंगाकडे झुकणारा स्वतःचा रंग होता. असे पाणी सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये पाहायला मिळत नाही.

दुसरा धबधबा पहिला आणि आपण भारतामध्ये आहोत यावर विश्वासच बसेना. तीन टप्प्यामधील या धबधब्याचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. आपण अनेकदा भिंतीवर लावलेल्या पोस्टरमध्ये असा धबधबा पाहतो. इथल्या खडकांचे वैशिष्ट्य म्हणजे हा एकसंध खडक नसून एकावर एक दगडाच्या चकत्या ठेवाव्यात असे लेअर्ड खडक आहेत. या धबधब्याचे नाव वै सॉडाँग (Wei sawdong) या धबधब्याच्या पायथ्यापर्यंत आपल्याला जाता येते. मात्र त्या ठिकाणी जाणारा मार्ग जरासा कठीण आहे. काही ठिकाणी बांबूच्या शिड्या तयार केल्या आहेत त्या शिड्यावरून सावकाश खाली उतरायचे. पूर्णपणे दाट जंगलातून वाट काढत जायचे. मेघालयचे हे पर्यटनस्थळ असल्यामुळे पर्यटकांची संख्या बरीच असते.

याच ठिकाणापासून अलीकडे दीड किमी अंतरावर दुसरा एक धबधबा आहे. त्याचे नाव दैन्थलेन धबधबा (Daiñthlen Falls) याठिकाणी आम्हाला दीड किमीवरील वै सॉडाँग (Wei sawdong) धबधबा चालत जाऊन पाहून परत जमायचे होते. येथून आम्हाला बसमधून चेरापुंजीला घेऊन जाणार होते. त्याठिकाणी असलेल्या डॉन बॉस्को शाळेमध्ये आमची रहाण्याची सोय करण्यात आली होती.

दरम्यानच्या काळात वै सॉडाँग (Wei sawdong) धबधब्याजवळच आम्हाला घेऊन जाण्यासाठी बस येईल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आमची दीड किमी ची पायपीट वाचणार होती. वै सॉडाँग धबधबा पाहून पुन्हा आम्ही रस्त्यावर बसची वाट पाहू लागलो. पण बस यायला तयार नाही. शेवटी कंटाळून चालत दैन्थलेन धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो तर वाटेत आम्हाला घेण्यासाठी बस येताना दिसली. ड्रायव्हरकडे विचारणा केली, ” व्हाय सो लेट ?” तर त्याने आपल्या तोडक्यामोडक्या इंग्रजीमध्ये सांगितले की, मी तिथे आलो होतो, पण तुमच्यापैकी चार-पाच जणांनी चहा प्यायचा म्हणून दैन्थलेन धबधब्याच्या ठिकाणी आणून सोडण्यास सांगितले. त्यामुळे मला उशीर झाला. हे ऐकून माझे पित्त खवळले.

ट्रेकमध्ये कुणालाही अशी वेगळी वागणूक मिळता कामा नये. सगळ्यांनी सोबत जायचे असे ठरले असताना त्यांना स्पेशल ट्रीटमेंट का ? असा माझा सवाल होता. त्यावेळी माझ्या अंगात हुतात्मा बाबू गेणू संचारला होता की काय कुणास ठाऊक ! मी चक्क त्या बसच्या चाकासमोर झोपलो आणि ‘कोण ते चार लोक आहेत, ज्यांच्यामुळे आम्हाला दीड किमी चालावे लागले ते सांगा. नाहीतर मी युथ हॉस्टेलमध्ये तक्रार करेन’ असा दम भरला. आम्हाला दीड किमीची पायपीट झाली याचे दुःख मुळीच नव्हते. कारण इतके चाललो त्यामध्ये दीड किमीचे काय कौतुक ? अखेर सर्व प्रकार हा ड्रायव्हरच्या आगावूपणामुळे झाल्याचे समजल्यानंतर माझा पारा खाली उतरला. झाल्या प्रकाराबद्दल मी सगळ्यांची जाहीर माफी मागितली आणि प्रकरणावर पडदा पडला. चेरापुंजीला पोचल्यानंतर मी त्या ड्रायव्हरला समजावून सांगितले. त्याने सुद्धा ” इट्स माय मिस्तेक सर, आई एम सॉरी” असे म्हणत क्षमा मागितली.

चेरापुंजीला डॉन बॉस्को चर्चच्या खाली असलेल्या एका हॉलमध्ये आमची सोय करण्यात आली होती. जेवण झाले आणि आम्ही स्लीपिंग बॅगमध्ये स्वतःला सरकवून घेतले. उद्याचा ट्रेक हा खऱ्या अर्थाने आव्हानात्मक होता. जवळपास साडेतीन हजार फूट खोल दरी उतरून रेनबो धबधबा पाहून तेथून दरीमधूनच तासाभराची पायपीट करून झाडांच्या मुळापासून तयार झालेला डबलडेकर पूल पाहायचा होता. तेथून पुन्हा 3500 पायऱ्या चढून तैरना (Tyrna) गावात आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी जायचे होते. म्हणजे आमच्या ट्रेकिंगच्या क्षमतेचा कस लागणार होता.
(क्रमशः)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like