Pune News : ६०० माजी सैनिक पत्नींच्या बचत गटाची ट्रॅव्हल्स कंपनी !

माजी सैनिकांच्या पत्नींचा पुढाकार

 एमपीसी न्यूज  : माजी सैनिकांच्या पत्नींनी पुढाकार घेत वाहतूक कंपनीची स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून 44 बस खरेदी करण्यात आल्या आहेत. त्या बस पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. रविवारपासून सेवा देणार आहेत.

सहा जिल्ह्यातील 600 स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नींनी एकत्र येऊन स्वयं साहाय्य गट तयार केला आहे. गटाच्या माध्यमातून वाहतूक कंपनी स्थापन केली आहे. कंपनीच्या वतीने घेण्यात आलेल्या 44 बस पीएमपीच्या ताफ्यात समाविष्ट झाल्या असून, रविवारपासून संचलन करण्यात येणार आहे. स्वयं साहाय्य गटातील महिलांनी बचत व बँकेकडून कर्ज घेऊन उभारलेल्या भांडवलातून बस खरेदी केल्या आहेत.

माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी चालविलेल्या गटामार्फत 44 बस भाडेतत्त्वावर घेण्याला पीएमपी संचालक मंडळाने गेल्या वर्षी मान्यता दिली होती. पीएमपीने ‘सीएनजी’ बससाठी मागविलेल्या निविदेतील अटी-शर्तींनुसारच बचत गटाकडून भाडेतत्त्वावरील बस घेण्यात येतील, अशी घोषणा तत्कालीन महापौर मुक्ता टिळक आणि पीएमपीचे तत्कालीन संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी महिला दिनाच्या दिवशी केली होती. त्यानुसार आता महिला बचत गटाने विश्वयोद्धा शेतकरी मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीचे मुख्यालय सातारा असून, त्यामध्ये सहा जिल्ह्यांतील 600 महिलांचा समावेश आहे.

माजी सैनिक कल्याण निधीच्या साहाय्याने आणि बँकेमार्फत अर्थसाहाय्य घेऊन या कंपनीने 44 बस घेतल्या आहेत. या कंपनीचा पुढील सात वर्षांसाठी पीएमपीशी करार झाला आहे. तसेच, या बसवर चालक आणि वाहक म्हणून अनुक्रमे माजी सैनिक आणि सैनिकांच्या पत्नी, हुतात्मा सैनिकांच्या पत्नी, मुलींना प्राधान्य दिले जाणार आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात सुमारे 180 जणांना रोजगार प्राप्त होणार आहे.

पीएमपीच्या ताफ्यातील सीएनजीवर धावणार्‍या साडेसहाशे बस या ठेकेदारांमार्फत पुरविल्या जात होत्या. त्यात आता या 44 बसची भर पडली आहे. या बस उभ्या करण्यासाठी गुजरवाडी (कात्रज) डेपो येथे त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती पीएमपीच्या अधिकार्‍यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.