Pune : कोरोनासह अन्य आजाराच्या रुग्णांवर वेळेत उपचार करा – जिल्हाधिकारी

Treat corona patients as well as patients with other ailments in time- District Collector.

एमपीसी न्यूज – जिल्हयात कोरोना आणि अन्य आजाराच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी सर्व डॉक्टरांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू संसर्गाच्या  प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली खासगी आणि शासकीय रुग्णालय व प्रयोगशाळांच्या डॉक्टरांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

बैठकीसाठी साखर आयुक्त सौरभ राव, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, खासगी आणि शासकीय रुग्णालय व प्रयोगशाळांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, जिल्हयातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर  खासगी आणि शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी कोरोना आणि अन्य आजाराच्या रुग्णांवर वेळेत उपचार करुन त्यांना मानसिक आधार देवून वैद्यकीय सेवेविषयी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा.

तसेच ज्या खाजगी हॉस्पिटलमध्ये कोविडची तपासणी करण्याची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी कोवीडच्या रुग्णांना भरती करण्यासाठी आदेश द्यावेत.

शासकीय व खासगी  प्रयोगशाळांमध्ये मोठया प्रमाणात कोविड-19 नमुने तपासणीसाठी येत असतात त्या नमुना तपासणीचे अहवाल वेळेत प्राप्त करुन द्यावेत. सर्वांनी प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा.

तसेच प्रयोगशाळांसाठी पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक असणाऱ्या मशिनरी, साहित्य कमी पडत असल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी. आपणास आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याकरीता प्रशासन सहकार्य करेल, असेही राम यांनी सांगितले.

साखर आयुक्त सौरभ राव म्हणाले, सर्व शासकीय व खासगी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय  ठेवून कामे करावीत आणि काही अडीअडचणीबाबत तात्काळ जिल्हा प्रशासनास माहिती सादर करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.