Pimpri news: ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांना वेळीच उपचार द्या; महापौरांच्या प्रशासनाला सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना रुग्ण संख्या कमी होत असताना म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत आहेत. सध्या पिंपरी येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरु असुन त्यातील काही रुग्णांना उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांना वेळीच, योग्य उपचार द्यावेत अशा सूचना महापौर उषा ढोरे यांनी  प्रशासनाला दिल्या.

म्युकरमायकोसिसची  माहिती घेवुन उपाययोजना करण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांच्यासमवेत बैठक घेवुन महापौर ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आढावा घेतला. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे, डॉ. अनिकेत लाठी आदी उपस्थित होते.

म्युकर मायकोसिस हा बुरशीसारखा संसर्गजन्य आजार असुन त्यामुळे उपचाराअभावी रुग्णाचा चेहरा, नाक, डोळ्याचा भाग, मेंदू यावर परिणाम होऊ शकतो. या बुरशीचा संसर्ग वाढल्यास दृष्टी जाऊ शकते, बुरशीचा संसर्ग फुप्फुसापर्यंत जाऊन प्रसंगी रुग्णाचा मृत्यु देखील होवु शकतो.

हा आजार शक्यतो बहुतांशी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णामध्ये आढळून येतो. यासाठी रुग्णालयांमधुन जे कोविड रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आलेले आहेत. त्यांची महापालिकेच्या वॉररुम मधुन मोबाईल फोनद्वारे विचारपुस केली जाणार आहे.

या चौकशीच्या माध्यमातुन ज्या रुग्णांमध्ये म्युकर मायकोसिसची लक्षणे आढळून येतील त्यांना त्वरीत उपचार घेण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. यामुळे म्युकर मायकोसिसच्या संभाव्य रुग्णांना वेळीच व अगोदर आजाराची माहिती होवुन प्राथमिक स्तरावरच उपचार घेणे शक्य होणार आहे.

रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. याप्रमाणे कामकाज करण्यासाठी वॉररुम मधील यंत्रणा कार्यान्वित करावी, अशा सुचना बैठकीत झालेल्या चर्चेवेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केल्या.

कोविड-19 तसेच आता म्युकर मायकोसिस रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील मानधनावरील कर्मचाऱ्यांबरोबरच कायम कर्मचाऱ्यांना देखील अधिकचे काम करावे लागत आहे.

त्यामुळे या कायमस्वरुपी डॉक्टर्स, नर्सेस, व सर्व पॅरामेडीकल स्टाफ, प्रयोगशाळा सहाय्यक आणि वर्ग 4 मधील कर्मचारी यांना प्रोत्साहनात्मक भत्ता देण्यात यावा अशी सुचना सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आयुक्त राजेश पाटील यांना केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.