Pimpri News : वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य संभाजी बारणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

एमपीसी न्यूज – थेरगाव येथील वृक्ष प्राधिकरण समितीचे सभासद आणि मराठी भाषा संवर्धन समितीचे सदस्य संभाजी बारणे यांनी आज (शुक्रवारी, दि. 24) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला.

पुणे येथे झालेल्या या पक्ष प्रवेशाच्या वेळी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक विनोद नढे, कैलास बारणे, अभय मांढरे, संतोष बारणे आदी उपस्थित होते.

भाजप संलग्न अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांनी मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, तसेच भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका माया बारणे यांचे पती संतोष बारणे यांनी देखील राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर आता संभाजी बारणे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्यामुळे शहर भाजपला मोठा धक्का बसला आहे.

संभाजी बारणे हे सन 2017 साली झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार होते आणि त्या निवडणुकीत त्यांचा अल्पमताने पराभव झाला होता.

कैलास बारणे, संतोष बारणे यांच्या नंतर संभाजी बारणे यांचा राष्ट्रवादीतला प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचा एक मोठा नेता राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे, त्यांचा लवकरच जाहीर प्रवेश होणार आहे’, असे सूतोवाच अभय मांढरे यांनी केले. यामुळे हा भाजपचा नेता कोण, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.