Pimpri: अभिनव उपक्रम ! कोरोनाग्रस्तांच्या स्वास्थ्यासाठी वृक्षारोपण

सर्व कार्यकर्त्यांना सकारात्मक उर्जा मिळावी, त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी वृक्षारोपण केले करण्यात आले.

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील विविध सामाजिक संस्थांनी एकत्रित येत एक अभिनव उपक्रम पार पाडला. शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, संघटनांचे अनेक होतकरू कार्यकर्ते कोरोना बाधित आहेत. या सर्व कार्यकर्त्यांना सकारात्मक उर्जा मिळावी, त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी वृक्षारोपण केले करण्यात आले. विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी रविवारी (दि.26) सकाळी सात वाजता प्राधिकरणातील शास्त्री चौक येथे एकत्र येऊन मुख्य रस्त्याच्या दुभाजकामध्ये 25 देशी झाडांचे रोपण केले.

पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक क्षेत्रात सक्रिय विविध संस्थांच्या माध्यमातून रविवारी ही देशी रोपांची लागवड केली. त्यात पारिजातक, कदंब, चारोळी, कौशी, पाडळ, टेम्भुर्णी, हिरडा, पारिजात आदींचा समावेश आहे.

खड्डा खोदून त्यात गवताचा पालापाचोळा टाकून रोपे लावली आणि ते झोड कोणते आहे त्याची माहिती, त्याचा उपयोग आदी तपशील असलेले छोटे फलक तिथे लावण्यात आले. प्राधिकरणातील रहिवाशांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

पवना जलदिंडीचे आधारस्तंभ राजीव भावसार यांच्या पत्नी आणि मुलगा कोरोना बाधित असून त्यांच्यावर बिर्ला रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन गायकवाड, माणिक धर्माधिकारी हे सुध्दा थेरगावातील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत.

धर्माधिकारी आणि त्यांच्या आईच्या स्वास्थ्यासाठीही वृक्ष लागवड केली. यावेळी पिंपरी-चिंचवड पर्यावरण संवर्धन समितीचे प्रमुख दिवंगत विकास पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने त्यांना आदरांजली वाहण्यात आली आणि त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले.

महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांची कन्या नेहा हिच्या कल्पनेतून हा अभिनव उपक्रम प्रत्यक्षात आला. येत्या आठ दिवसांत रस्त्याच्या दुभाजकावर 60 विविध देशी जातीची प्रत्येकी दोन रोपे दोन्ही बाजूस लावून शहरातील जैवविविधता वाढवण्यासाठी काम केले जाणार असल्याचे मुख्य संयोजक निसर्गराजा मित्र मंडळाचे धनंजय शेडबाळे यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पूर्ण उपक्रमात मास्क वापरून सुरक्षित अंतर ठेवून कार्यकर्ते एकत्र आले होते. धनंजय शेडबाळे यांच्यासह सूर्यकांत मुथीयान, प्रवीण लडकत, अविनाश चिलेकर, अभय कुलकर्णी, शिवलिंग धवळेश्वर, भास्कर रिकामे, राहुल घोलप, मनोहर कड, लाला माने आदी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.