Tree Planting : मावळामधील 272 जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘झाडांची शाळा’ वृक्षारोपण मोहीम

एमपीसी न्यूज – वसुंधरा पर्यावरण संवर्धन संस्था पुणे व गाया कंजर्वेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मावळातील 272 जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘झाडांची शाळा’ ही वृक्षारोपण (Tree Planting) मोहीम राबवली जाणार आहे. जून आणि जुलै महिन्यात 272 जिल्हा परिषदेच्या शाळांसह इतर शाळांच्या परिसरातही वृक्षारोपण केले जाणार असून 57 प्रकारच्या तब्बल 28 हजार झाडांचे वृक्षारोपण होणार आहे. या झाडांपासून सुमारे 21 हजार टन प्राणवायूची निर्मिती होणार आहे. या मोहिमेची सुरुवात वराळे येथून झाली आहे.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वसुंधरा पर्यावरण संवर्धन संस्था पुणे व गाया कंजर्वेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने मावळ भागातील 272 जिल्हा परिषद शाळा तसेच इतर शाळांच्या परिसरामध्ये येत्या जून, जुलै महिन्यामध्ये वृक्षरोपण (Tree Planting) करण्यात येणार आहे.

वृक्ष निवडताना त्या झाडाचे आयुष्य किमान दोन वर्षे पूर्ण असणारे व झाडाची उंची किमान पाच फुटाच्या पुढे असणार आहे. वृक्षांचे प्रकार- फळ वृक्ष- आवळा, आंबा, चिंच, जांभूळ. फुल वृक्ष- ताम्हण, बकुळ, प्राजक्त, माहु. आयुर्वेदिक वृक्ष – कडुलिंब, अर्जुन, बेहडा, जारुळ. अशा एकूण 57 प्रकारच्या वृक्षांची निवड करण्यात आली आहे. अंदाजे 28 हजार झाडांचे वृक्षारोपण होणार आहे.

Symbolic fasting in Pimpri : पालिकेच्या पर्यावरण विरोधी भूमिकेविषयी पिंपरीत सांकेतिक उपोषण 

तज्ञांच्या मते हे वृक्षरोपण झाल्यानंतर या झाडांपासून दरवर्षी 750 टन कार्बन डायऑक्साइड (कार्बनसिंक) शोषून घेतील व दरवर्षी कार्बनसिंकचे प्रमाण वाढत राहणार आहे. या झाडांपासून जवळपास 21 हजार टन प्राणवायूची निर्मिती होणार आहे. या झाडांचा प्राथमिक दृष्ट्या फायदा शाळेतील मुलांच्या आरोग्यासाठी होणार आहे. या मोहिमेची सुरुवात वराळे येथील जिल्हा परिषद शाळा व भैरवनाथ विद्या मंदिर येथून संपन्न झाली.

या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे, शिक्षण विस्तार अधिकारी शालिनी ढवळे, ज्ञानेश्वर शिवणेकर सर, स्वप्निल नंदकिशोर सोनवणे (वरिष्ठ सल्लागार, गाया कंजर्वेशन) हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. तसेच, या मान्यवरांकडून या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमासाठी संस्थेकडून पाच टीम बनवण्यात आल्या आहेत. या टीम संपूर्ण जून, जुलै महिन्यामध्ये मावळ भागातील प्रत्येक शाळेमध्ये वृक्षरोपण करणार आहेत. टीमचे नेतृत्व पर्यावरण मित्र संदीप कुंजीर हे करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अंकुश भोकसे, उत्तम शिंदे, अनिकेत कुंजीर, भूषण खांडेभराड, चंद्रकांत फाले व इतर पर्यावरण मित्र हे काम पाहणार आहेत.

ह्या कार्यक्रमाचे (Tree Planting) नियोजन संस्थेचे अध्यक्ष किशोर शिवाजी गराडे व स्वप्निल नंदकिशोर सोनवणे यांनी केले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना त्यांनी असे सांगितले आहे, की संपूर्ण महाराष्ट्रभर हा वृक्षारोपणाचा झाडांची शाळा हा (मावळ पॅटर्न) उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. तसेच, या कार्यक्रमासाठी आपल्या भागातील स्थानिक मित्र मंडळे साम्राज्य ग्रुप, वीर मावळे, छत्रपती शासन ग्रुप व कुंग-फू स्पोर्ट्स असो. ऑफ महाराष्ट्र हे सहकार्य करणार आहेत. पुढील काळात पुणे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती कार्यक्रम व स्थानिक बीज संकलन अभियान हा उपक्रम संस्थेमार्फत राबवणार आहोत. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी सर्व मान्यवरांचे तसेच पर्यावरण प्रेमींचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.