Chinchwad : सामाजिक संघटनांच्या आंदोलनांनंतरही बेकायदेशीर वृक्षतोड चालूच (व्हिडीआे)

एमपीसी न्यूज – सुमारे 30 सामाजिक संघटनांच्या वतीने नुकतेच निगडी येथील टिळक चौकामध्ये बेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात मानवी साखळी करत आंदोलन केले होते. आंदोलनानंतरही बेकायदेशीर वृक्षतोड शहरात सुरूच आहे. आज (मंगळवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास चिंचवड मधील प्रेमलोक पार्क येथे बेकायदेशीर वृक्ष तोडणा-यांना नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या रस्ता दाखवला.

वृक्षप्रेमी प्रदीप शाळीग्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड मधील प्रेमलोक पार्क येथे नक्षत्रम सोसायटीच्या मागच्या बाजूला आज (मंगळवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास आठ ते दहा जणांच्या टोळक्याने एका मोठ्या वृक्षाला जमीन दाखविली. त्यानंतर ते सोसायटीच्या पुढच्या बाजूच्या झाडाच्या फांद्या कापत होते. एवढ्यात जमलेल्या वृक्षप्रेमींनी वृक्षतोड करणा-यांना वृक्षतोडीचा परवानगीबाबत विचारणा केली. त्यावर वृक्षतोड करणारे सर्वजण निरुत्तर झाल्याने, वृक्षप्रेमींनी त्यांना चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल केले. दरम्यान टेम्पो (एम एच 04 / डी एस 6074) चालक आणि कॉन्ट्रॅक्टर पळून गेले.

_MPC_DIR_MPU_II

चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणाले, दुपारी साडेचारच्या सुमारास प्रेमलोक पार्क येथे बेकायदेशीर वृक्षतोड होत असल्याची माहिती मिळाली. वृक्षप्रेमींनी पोलिसांच्या मदतीने वृक्षतोड करत असलेल्या काही लोकांना पोलीस ठाण्यात आणले आहे. त्यातील दोन लोक पळून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे परवानगी आहे का? तसेच महापालिकेच्या उद्यान विभागाने याबाबत परवानगी दिली आहे का? याबाबत चौकशी सुरु आहे. उद्यान विभागाशी अद्याप संपर्क झाला नाही. उद्यान विभागाने तक्रार दिल्यास तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. उद्यान विभागाशी संपर्क करणे सुरु आहे.

याबाबत उद्यान विभागाशी संपर्क केला असता होऊ शकला नाही. शहरात सुरु असलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात सुमारे 30 सामाजिक आणि पर्यावरणप्रेमी संघटनांनी एकत्र येत निगडीमध्ये मानवी साखळी करत आंदोलन केले. त्यानंतर देखील शहरात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. सामाजिक संघटनांमधून याबाबत निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.