उंबरखिंडची विजयी शौर्यगाथा…

(स्वप्निल घोलप)

तुंग-तिकोना-उंबरखिंड-सुधागड मोहीम

एमपीसी न्यूज- ज्या सह्याद्रीच्या डोंगररांगांनी छत्रपती शिवरायांना हे स्वराज्य उभे करण्यास साथ दिली, त्याच सह्याद्रीची यशोगाथा कसं बरं आपण विसरून चालेल ? ह्याच डोंगररांगांनी प्रामाणिकपणाने महाराजांचा ईमान राखला आणि आलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केले. ह्याचेच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे उंबरखिंडीतील रणसंग्राम…

नेहमी आजपर्यंत मुंबईवरून दुर्गदुर्गेश्‍वर रायगडाकडे जात असताना मध्ये छोटासा उंबरखिंड नावाचा फलक दिसायचा. आणि आमच्या जाणकार मित्रांमधे चर्चा चालू व्ह्यायची ती, या खिंडीत महाराजांनी वापर केलेल्या त्या बुध्दीचातुर्याची आणि गनिमी काव्याची.आजपर्यंत वाचत आलेलो या खिंडीबद्दलचा इतिहास तो प्रत्यक्षात अनुभवायची त्या जागेत नतमस्तक व्ह्यायची वेळ लवकरच आली.

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर, 26 जानेवारी 2018. आमच्या गिर्यारोहक समुहाने मोहीम आखली. शिवराष्ट्र हायकर्स आयोजित किल्ले तुंग, तिकोना, उंंबरखिंड, सुधागड. 26 ते 28 जानेवारी 2018 ही मोहिमेची तारीखही निच्छित झाली.मनात एकच हर्ष घूमाव घालत होता उंबरखिंडीतील रणसंग्राम प्रत्यक्षात अनुभवायला भेटणार…

मोहिमेचा दिवस उजाडला, ठरल्याप्रमाणे 26 जानेवारी संध्याकाळी लोणावळ्यामध्ये एका कार्यालयमध्ये सर्व गिर्यारोहकांनी हजेरी लावली. सर्व गिर्यारोहक मित्रं परिवार पुन्हा भेटला आणि गप्पा रंगल्या.. सर्वांनी आपआपले प्रवेशपत्र भरून संस्थेतर्फे सर्वांना टी शर्ट आणि टोपी देण्यात आली. सर्वांचे ओळख प्रदर्शन झाल्यानंतर बालव्याख्याते कु. भूपाल शेळके (संगमनेर ) यांचे वीरांची शौर्यगाथा या विषयावर व्याख्यान झाले. प्रजासत्ताक दिनी भूपालने वीरांची गाथा ऐकवुन सर्वांनाच हळवे करून टाकले.. शिवभक्ती म्हणजेच देशभक्ती या पंक्तीस उजाळा मिळाला. व्याख्यान आटोपताच् सर्वांनी जेवण आटोपले. थंडी ही कडाक्याची होती. लोणावळा म्हटल्यानंतर एकदम गार वारा अंगांभोवती गोंगावत होता. या मोहिमेत महाराष्ट्र आणि अन्य राजातून 150-200 गिर्यारोहकानी सहभाग घेतला होता..

27 जानेवारी 2018 पहाटे उठून सर्वांनी आपआपली तयारी करून नाश्ता उरकून घेतला. सर्वांना जेवणाचे डब्बे देण्यात आले. राष्ट्रगीत, महाराजांचा जयघोष बोलून मोहिमेस सुरवात झाली. सर्व जण बाहेरून, लांबून आल्यामुळे स्वताच्या गाड्या बरोबर होत्या. सर्वांनी किल्ले तिकोनाकडे प्रस्थान केले.आम्ही सकाळी 10 वाजता तिकोनाच्या पायथ्याशी पोहोचलो. आमच्याबरोबर लोकसभा खासदार शिवभक्त राजू शेट्टी हेही सहभाही झाले होते. ते दोन ही दिवस या पूर्णपणे मोहिमेत सहभागी होते. गडमाथ्यावर चढून गेल्यानंतर महादेवाचे मंदिर, दोन तळी आणि धान्य कोठाराचे पडीक अवशेष दिसतात. बालेकिल्ल्याच्या खालील भागात श्री तुळजाईचे मंदिर आहे.

इतिहासाकडे पाहता, छत्रपती शिवरायांनी हा किल्ला इ.स. 1657 मधे जिंकला आणि स्वराज्याचा भगवा फडकावला. पुरंदरच्या तहात जयसिंगाला देण्यात आलेल्या 23 किल्ल्यांपैकी हा एक किल्ला. किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले. समुद्रसपाटीपासून जेमतेम 3500 फूट उंचीचा सोपा गिरीदुर्गच म्हणावं लागेल. सद्यस्थितीत सुजित मोहोळ (स्थानिक) किल्लेदार म्हणुन आपली भूमिका बजावत आहेत.

किल्ला उतरुन, पायथ्याशी आम्ही दुपारच स्नेहभोजन घेतले आणि किल्ले तुंगकडे रवाना झालो. दुपारी 2 वाजता किल्ले तुंग चढाई चालू केली. दिवसातील दुसरा किल्ला सर करत असताना देखील गिर्यारोहकाच्या चेहर्‍यावर कोणताही थकवा जाणवत नव्हता. कारण सहयाद्रीच्या कुशीत आणि निसर्गाच्या वार्‍यात नेहमी गिर्यारोहक आनंदच लुटत असतो. काहीच वेळेत आम्ही किल्ले तुंगही सर केला आणि आपला स्वराज्याचा भगवा फडकवून मानवंदना दिली.

किल्ले तुंग समुद्रसपाटी पासून जेमतेम 3000 फूट उंचीचा, सोप्या चढाईचा गिरीदुर्ग आहे. हा सुधा किल्ला राजांनी पुरंदरच्या तहात जयसिंगाला दिला होता. एक हनुमान मंदिर गडावर पाहण्यास मिळेल. उजवीकडे गणेशमंदिर आहे. बालेकिल्ल्यावर तुंगाईदेवीचे मंदिर आहे. एक तळे आणि दोन- तीन पाण्याचे टाके ही किल्ल्यावर आहे.

लवकरच गड उतरणी करून आम्ही आपला प्रवास खोपोली मार्गे चावनी (छावणी) या गावाकडे फिरवला. आमचा मुक्काम याच गावात होता. येथून एखाद्या की.मी. च्या अंतरावरच उंबरखिंड विजयशिल्प आहे. रात्री थोर इतिहासकार शिवसंत अप्पा परब यांच्या शब्दात उंबरखिंडीतील रणसंग्राम, व्याख्यान ऐकायला भेटले. अप्पांच्या शब्दात रणसंग्राम ऐकणे म्हणजे जणू आपणच त्या संग्रामात सशस्त्र झुंजत आहोत. 28 जानेवारीची पहाट, मंद वार्‍याची झुळूक हळूच अंगाला स्पर्श करून जात कानी सांगून जात होती, ‘मावळ्यांनो 350 वर्षांपूर्वी तुमच्याच पूर्वजांनी येथे रक्त सांडिलें म्हणुण तर तुम्ही आज ताठ मानेने वावरत आहात’.

सर्वांनी गावातील हातपंपावर आंघोळी केल्या, नाश्ता उरकून ऊंबरखिंडीतील विजयी शिल्पाकडे कूच केली. हळूहळू सर्वांची छाती अभिमानाने फुलून येत होती, कारण माझ्या राजानं याच खिंडीत कोकण काबिज करण्याचे स्वप्न बाळगून आलेल्या कारतलब खानाची कोंडी करून गनिमी काव्याचे आधारे कमी सैन्यामधे मोठ्या संख्येत आलेल्या शत्रूला धूळ चारली. योग्य ठिकाणी योग्य कोंडी करून शत्रूला शरणागतीस महाराजांनी भाग पाडले. पुण्यातून शास्ताखानाने कारतलबखानास उत्तर कोकणात चालून जाण्यास सांगितलेले, त्या वेळेस महाराज आपल्या तैनात असलेल्या विसापूर, लोहगड येथील मावळ्यांकडून लढाई करू शकत होते पण तिथे कोंडी करणे जमले नसते म्हणुन महाराजांनी उंबरखिंड निवडली. आणि शत्रुंची कोंडी करून त्याचा पराभव करण्यात यश मिळाले. उंबरखिंडीत उभारलेल्या शिल्पाचे पूजन झाले. याच ठिकाणी शिवराष्ट्र हायकर्स नियोजित पन्हाळगड ते पावनखिंड रौप्य महोत्सवी वर्ष 2018 ह्या मोहिमेचे चिन्ह(लोगो) प्रदर्शित करण्यात आले. मानवंदना झाली.आणि पुढील वाटचाल सुधागडकडे.

भर उन्हात 12 वाजता सुधागड च्या पायथ्याशी पोहोचलो आणि लगेच सर्वांनी आपले जेवणाचे डब्बे आणि पाणी घेऊन किल्ले चढाई सुरवात केली. जंगलातुन पाऊलवाटाणे किल्ले पायथ्याशी पोहोचावे लागते. झाडांमध्येे लपलेला या गडाचा विस्तार फार मोठा आहे, उंची जेमतेम 590 मीटर इतकी आहे. पूर्वी हा गड भोरपगड म्हणुन ओळखला जाई. परंतु स्वराज्यात आल्यानंतर छत्रपती शिवरायांनी याच नाव सुधागड असे ठेवले. भरपूर मजबूत अशी गडाची बांधणी दिसून येते. पूर्ण 55 एकरचा परिसर किल्ल्याने व्यापला आहे. किल्ल्यावर मोडकळीस असलेले राजवाड्यांचे अवशेष, सदर, भोराई देवीचे मंदिर, काही शिळा, भले मोठ तळ, पाण्याचे टाके, टकमक टोक आणि महादरवाजा आदींचे दर्शन होते. वरती आपण मुक्काम ही करू शकतो. सर्व किल्ले बघून झाल्यानंतर सर्वांनी जेवण करून, विश्रांती घेतली आणि गड उतरण्यास सुरुवात केली.

खाली उतरताना आम्हाला काळोख झाला होता आणि उतरल्यावर सर्वजण एकमेकांचे निरोप घेण्यात मग्न होते. पाय हालत नव्हते अंतर्मन मानत नव्हते पण काही पर्याय नसल्याने सर्वांना त्यांच्या कर्मभूमीत यावेच लागते. दुसर्‍या दिवशी दैनंदिन जबाबदार्‍या साठी सर्वांना सज्ज व्हायचेच होते. कसेबसे मनाची समजूत काढून सर्वांनी निरोप घेतला आणि परतीचा प्रवास सुरू झाला. मित्रांनो, ही अशी घडली आपली शिवराष्ट्र हायकर्स आयोजित तुंग- तिकोना- उंबरखिंड – सुधागड मोहीम. मोहिमेचे नेतृत्व आपले सर्वांचे आवडते दुर्गअभ्यासक प्रशांत साळुंखे सर हे करत होते.

या मोहिमेत शिवव्याख्याते दीपकराव करपे, जळगावचे तहसीलदार मनोज देशमुख, परभणीचे जिल्हा उपनिबंधक महादेव यादव यांच्यासह अनेक शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या गिर्यारोहणातून आपल्याला दैनंदिन कामामधे आलेली मरगळ ही निघून जाते. निसर्गाशी मैत्री करायला भेटते आणि मैत्री झाली तर निसर्ग आपल्याशी बोलतो.आजपर्यंत आलेल्या अनूभावातून निसर्गसारखा दुसरा मित्र नाही आणि सह्याद्री सारखा पाठीराखा नाही. नेहमी वेगळी स्फूर्ती भेटते, प्रेरणा भेटते आणि जगण्याचा नवीन मार्ग मिळतो. काय मग मित्रांनो येणार ना पुढील ट्रेकला सोबत ? ?

"Umberkhind

"Umberkhind

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.