Lonavala News : ‘हर घर तिरंगा’ ला आदिवासी बांधवांचा उत्साहात प्रतिसाद

एमपीसी न्यूज (श्याम मालपोटे) – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत शहरी भागासोबत ग्रामीण भागातही उत्साह पाहायला मिळत आहे. वडगाव मावळजवळील साते गावातील आदिवासीपाड्यावर देखील प्रत्येक घरावर तिरंगा डौलताना दिसला.

भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना संपूर्ण देशभरात अमृतमहोत्सवाचा सोहळा पार पडत आहे. एकात्मकतेचे प्रतीक असलेला भारतीय तिरंगा ध्वज आजपासून 15 ऑगस्टपर्यंत दररोज प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर फडकवावा व एकतेचा संदेश जगाला द्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हे ध्येयसाध्य करत असताना नागरिकांचा सहभाग देखील महत्वाचा आहे, त्याची प्रचिती ग्रामीण भागातील खेडोपाडी असलेल्या आदिवासीवस्तीवर देखील घरांवर देखील तिरंगा फडकताना पाहिल्यावर आलेली आहे.

भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू विराजमान झाल्या व त्याचा आनंद देखील ग्रामीण भागातील आदिवासी वस्तीवर साजरा करण्यात आला होता. देशाप्रती असलेली सद्भावना व संवेदनशीलता पाहून आदिवासी वस्तीमधील नागरिकांचं पंचक्रोशीतून कौतूक होत आहे.

हक्काचे घर नसताना देखील अभियानाला प्रतिसाद देत आदिवासी वस्तीवरील नागरिकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. परंतु त्यांचा हक्काच्या घरांसाठी प्रशासन व स्थानिक नेत्यांनीही पुढाकार घ्यावा, अशी मागणी देखील साते येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम आगळमे व ग्रामस्थांनी केली आहे. या अभियानाला प्रतिसाद त्यांनी दिला पण हक्काची घरे जेव्हा मिळतील तेव्हाच भारत स्वातंत्र्याचा महोत्सव आणखी द्विगुणित होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.