Tribute By Latadidi To Kargil Worriers: लतादीदींनी कारगिल दिनानिमित्त केले शहिदांना वंदन

Tribute By Lata mangeshkar To Kargil Worriers त्यांनी स्वत: गायलेलं ‘ऐ मेरे वतन के लोगों’ या गाण्याचा व्हिडिओ पोस्ट केला. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

एमपीसी न्यूज – कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने रविवारी म्हणजे २६ जुलै रोजी आपण शहिदांना नमन केले. २१व्या ‘कारगिल विजय दिना’निमित्त सर्वच भारतीयांनी यातील योद्ध्यांना अभिवादन केले. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कारगिल युद्धात अतुलनीय शौर्य गाजवलेल्या सर्व जवानांच्या धैर्याला आणि पराक्रमाला सलाम केला आहे. त्यांनी स्वत: गायलेलं ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गाणं ट्विट करुन भारतीय लष्कराचं कौतुक केलं आहे.

‘आज ‘कारगिल दिना’निमित्त माझ्या देशातील सर्व शूर सैनिकांना मी प्रणाम करते’, अशा आशयाचं ट्विट करुन लता मंगेशकर यांनी भारतीय लष्कराला सलाम केला.

त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट केलं. यामध्ये त्यांनी स्वत: गायलेलं ‘ऐ मेरे वतन के लोगों’ या गाण्याचा व्हिडिओ पोस्ट केला. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.


२६ जुलै म्हटले की प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरुन येतो. नेहमीच काहीना काही कुरापती काढणा-या पाकिस्तानला या दिवशी भारतीय लष्कराने चांगली धूळ चारली होती. हा दिवस देशासाठी लढणाऱ्या आणि जनतेचं संरक्षण करणाऱ्या शूरवीर जवानांची आठवण करुन देतो.

कारगिल युद्धाला यंदा 21 वर्षे झाली. 26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला होता. त्यामुळे या दिवशी ‘कारगिल विजय दिवस’ साजरा करण्यात येतो.

भारत आणि पाकिस्तानमध्ये जुलै 1999 मध्ये कारगिल युद्ध झाले होते. पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेचं उल्लंघन करुन भारतात घुसखोरी केली होती.


त्यावेळी समुद्र सपाटीपासून 18 हजार फूट उंची आणि बर्फाळ प्रदेश अशा प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्यानं धाडसानं शत्रूवर विजय मिळवला होता.

8 मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. 26 जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चाललं. अखेरच्या श्वासापर्यंत धैर्यानं लढा देत भारतीय सैन्यानं कारगिल युद्ध जिंकलं.

तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी यावेळी अत्यंत संयमाने सर्व परिस्थिती हाताळली होती. कारगिलमधील विजयानंतर पाकिस्तान नेहमीच पिछाडीवर राहिला होता. त्यामुळे नंतर दहशतवाद्यांच्या रुपाने पाकिस्तानने भारतात छुपे युद्ध सुरु केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.