Chikhali News : समाजोपयोगी उपक्रमांतून ‘दत्ताकाका’ यांना अभिवादन

एमपीसीन्यूज : सामाजिक कार्यातून पिंपरी चिंचवडच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात वेगळा ठसा उमटविणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेचे दिवंगत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विविध सेवाभावी उपक्रमांद्वारे अभिवादन करण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा चालविणारे त्यांचे चिरंजीव तथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने यांच्या नेतृत्वाखाली शहर आणि परिसरात गोरगरिबांना अन्नदान, धान्य वाटप, वृक्षारोपण, कंत्राटी सफाई कर्मचारी महिलांना चहाचे वाटप, देहू आणि आळंदी देवस्थानांना टाळ वाटप आदी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

स्व. दत्ता साने यांचा प्रथम स्मृतिदिन रविवारी (दि. 4 जुलै) साजरा करण्यात आला. यानिमित्त यश साने यांच्यावतीने देहू आणि आळंदी देवस्थान यांना टाळ वाटप केले. आळंदी येथे माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते आळंदी येथे, तर देहू येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत टाळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

चिखली -साने वस्ती येथील साने यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेससह विविध राजकीय पक्ष आणि संस्था संघटनांच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी स्व. साने यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर राहुल जाधव यांच्यासह संजय नेवाळे, फजल शेख, संगीता ताम्हाणे, वर्षा जगताप, गंगा धेंडे, कविता आल्हाट, सारिखा ढमे, हभप काळुराम मोरे, हभप खडूं मोरे, प्रवीण भालेकर, पंकज भालेकर, रवींद्र सोनवणे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, स्व. दत्ताकाका साने प्रतिष्ठान आणि वीर अभिमान्यू फ्रेंड सर्कल यांच्यावतीने साने चौकातील साने यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणाऱ्या 40 परिचारिकांचा गौरव करण्यात आला.

तसेच प्रभाग क्रमांक एकमधील कंत्राटी सफाई कामगार महिलांना दररोज चहा वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली. असाच उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष आतिष बारणे यांच्या पुढाकारातून मोशी परिसरात सुरु करण्यात आला.

चिखली येथिल तिरुपती बालाजी ग्रुपच्या वतीने देहूतील अनाथाश्रमात धान्य वाटप करण्यात आले, तसेच गोरगरीब आणि निराधार नागरिकांना अन्नदान करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते राज वाल्हेकर यांच्यावतीने अन्नदान आणि चिंचवड येथील अनाथाश्रमात धान्य वाटप करण्यात आले.

रांगोळीकार जयप्रकाश शिंदे यांनी दत्ता साने यांना आकर्षक रांगोळीतून आदरांजली वाहिली. त्याचबरोबर चिखली -मोरेवस्ती परिसरातील विविध महिला बचत गटांनी सामाजिक उपक्रम राबवून साने यांना अभिवादन केले.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी विधानसभा यांच्यावतीने दापोडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष मयूर कांबळे आणि शहर उपाध्यक्ष सुरज निंबाळकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.