Tribute to Rasika Joshi : आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने अल्पावधीतच ठसा उमटवून गेलेली रसिका

Rasika who has made an impression in a short period of time with her diverse acting

एमपीसी न्यूज – मराठी, हिंदी नाट्य चित्रसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रसिका जोशी हिचा आज स्मृतीदिन. लौकिक अर्थाने हिरॉइनसाठी लागणारा देखणा चेहरा या अभिनेत्रीला नव्हता. पण आपल्या निर्व्याज, लोभस आणि सहजसुंदर अभिनयाने तिने रसिकांना कधी हसवलं, तर कधी रडवलं, तर कधी अंतर्मुखदेखील केले. ख-या अर्थाने रसिक असणा-या या रसिकाला हर्षल विनोद आल्पे यांनी वाहिलेली ही आदरांजली.

प्रिय रसिकाताई ,

तू जिथे कुठे आहेस, तिथे तुला सर्वप्रथम  गुरुपौर्णिमेबद्दल त्रिवार वंदन.

आज ही तुझी ‘एक हसीना थी’ मधली ती भूमिका आठवते. लेडी क्रिमिनिलच्या रुपातली तुझी सहजता, तुझे ते कैदीच्या रुपातले बेरकीपण, ते उर्मिला मातोंडकरकडे बघणं हे सगळं आठवलं की तुझ्याविषयीची भीती अजूनच वाढते .

‘खबरदार’ चित्रपटातली तुझे संजय नार्वेकरच्या आईचे काम तर अजून ही मजा आणते. शेवटच्या सीन मधलं तुझं ते निर्मिती सावंतला ‘ए फुकणे’  म्हणणं आणि त्यावरची निर्मिती सावंत यांची रिएक्शन अगदीच लाजवाब. तुझ्याबद्दल विचार करायला लागलो की अशा असंख्य भूमिका आणि शॉटस  मनाच्या पडद्यावरुन अलगद जातात आणि येतात. तसं तुझा पडद्यावरचा माझ्याशी परिचय ‘हसा चकटफू’, ‘प्रपंच’ या मालिकेतून. या दोन्ही मालिकांमधून तशी कल्पना यायला लागलीच होती, की ही असामी वेगळी आहे.

स्त्री अभिनेत्री किती वेगवेगळ्या भूमिका करु शकते हेच त्यातून दिसत होतं. अनेकांना असा प्रश्न पडलेला असायचा की ही व्यक्ती एवढ्या वेगवेगळ्या भूमिका कशा करु शकते ? त्यानंतर ‘घडलंय बिघडलंय’ मधून तुझं दर्शन व्हायला लागलं. वेगवेगळ्या स्कीटस मधून वेगळी रसिका जोशी पाह्यला मिळाली. तसे चित्रपट ,नाटक ,आणि मालिका यातून तुझं काम आवडायचं याचं अजून एक कारण म्हणजे विनोद,  उत्स्फूर्तपणे केलेला प्रसन्न विनोद, ज्यातून निखळ करमणूक म्हणजे काय? ते ही कळत होतं. तू अशा अभिनेत्यांमध्ये होतीस की ज्यांना कुठलीही भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज फारशी लागायची नाही.  फक्त चेहरा दिसला की कळलंच की कोणता सीन चालू आहे.  गंभीर की विनोदी की अजून कुठला पण ! कधी कधी त्याही बाबतीत तू रसिकांना फसवू पहायचीस आणि आम्ही फसायचो. विशेषत  तू चाप्लीनला अपेक्षित असा गंभीरपणे विनोद ही तुला अगदी बेमालूम जमायचा. नव्हे त्यात तू अव्वल होतीस. कधी कधी मात्र तू या गंभीरपणातून बरंच काही शिकवून जायचीस .

तुझ्याविषयीचा एक किस्सा इथे लिहिल्याशिवाय राहवत नाही म्हणून सांगतो. एका अभिनय विषयक कार्यशाळेत तू आम्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आली होतीस तेव्हाचा हा किस्सा.  आम्ही सगळे जण तुझी आतुरतेने वाट बघत होतो. थोडा वेळ तसाच गेला.  त्यानंतर आपण वर्गात आलात तेच  मुळी दोन्ही हातात हार्मोनियम घेऊन, आम्ही मुलं जरासे चक्रावलोच, म्हटलं हे काय ? आपण म्हणालात, चला प्रत्येकानी आपापलं नरड उघडा.

आम्हाला कळेचना की हा काय प्रकार आहे ? आमच्यातल्या बहुतेक जणांना गाण्याचं भारी दडपण. मनातल्या मनात आम्ही तुला गाऊन ना घेण्याची विनवणी करतच होतो. एवढ्यात तूच म्हणालीस, मला तुमचा बोलण्याचा आवाज बघायचा आहे.  म्हटलं ठीक आहे. एकेकजण झाल्यावर शेवटी आमच्या गटातील एक मुलगी आली. तुला बघूनच ती घाबरलीच होती. तिला तू बोल असा हुकूमच सोडलास. ती अजूनच घाबरली. तिला काय बोलावं तेच कळेना

तू गंभीरपणे म्हणालीस, शिव्या दे. आम्ही सगळेच मुळासकट हादरलो. अशी कशी शिवी देणार चारचौघात ? बाकीची मुलं काय म्हणतील ? हे सगळे भाव त्या मुलीच्या चेह-यावर दाटले होते. आम्ही ही प्रश्नार्थक मुद्रेने पाहत होतो. इतक्यात सर्वात मोठ्या आवाजात तू फर्मास शिवी हासडलीस.  ती मुलगी घाबरुन आपल्या जागेवरच जाऊन बसली.  त्यानंतर लगेच तू खालच्या स्वरात अशी शिवी देता आली पाहिजे असं म्हणालीस.

त्या प्रसंगातून आम्ही मुलं एक धडा शिकलो तो म्हणजे जगात वावरताना बिनधास्तपणे वावरता आलं पाहिजे. हे मला जमणार नाही, लोक काय म्हणतील ? याची पर्वा न करता जे आम्हाला त्यावेळी करायचे आहे ते करुन मोकळे व्हायचे. घाबरायचे नाही, तुला लिह्याव्याश्या वाटल्या त्या कलाकृती ही तू रसिकांसमोर मांडल्या. आणि त्यातून रसिकांना भरभरुन आनंद ही दिलास .

आणि ७ जुलै २०११ ला या जगाचा कायमचा निरोपही घेतलास. तू मनस्वी अभिनेत्री होतीस हे मान्य,  पण हा नक्की निसर्गाचा काही खेळ होता की तुझा एक आविष्कार ? हा प्रश्न तुझ्या असंख्य चाहत्यांना पडला, नाही पडतोय ? कदाचित याचं उत्तर आम्हाला मिळेल किंवा मिळणार ही नाही! असो!

हु हु ….हे नुसतं कोरडं नाही बरं का ?

सलील कुलकर्णी त्यांच्या पुस्तकात लिहितात तसं,
आयुष्यात खूप गोष्टी सांगायच्या राहून गेल्या
कधी भीती मुळे
तर कधी त्या व्यक्तीच्या तेजात दिपून गेल्यामुळे
तशातला मी आज तुझी आठवण काढून डोळे ओले करतो
पण ! चेह-यावर मात्र हसू आहे .

आणि खात्री आहे की तू जिथे कुठे असशील तिथे सुद्धा आपल्या अभिनयाने चमकत  असशील.
हीच सदिच्छा आणि तुला भावपूर्ण आदरांजलीचा हा एक छोटासा प्रयत्न.

तुझ्या असंख्य चाहत्यांपैकी एक

हर्षल विनोद आल्पे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.