Tribute to Sam Manekshaw – फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर लवकरच हिंदी चित्रपट

Tribute to Sam Manekshaw - Tribute to Field Marshal Sam Manekshaw पाकिस्तानविरुद्ध 1971 च्या लढाईत विजय मिळवून देणारे भारताचे आठवे लष्करप्रमुख म्हणजे फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा आज स्मृतीदिन.

एमपीसी न्यूज – भारताने 1971 च्या युद्धात पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले आणि त्यांच्या ताब्यातील पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र करुन बांगलादेशची निर्मिती केली. ही ऐतिहासिक घटना ज्यांच्या कारकीर्दीत घडली ते भारताचे आठवे लष्करप्रमुख म्हणजे फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ. सॅम बहादूर या लाडक्या टोपणनावाने ओळखल्या जाणा-या सॅम माणेकशॉ यांचा आज स्मृतीदिन. त्यांचे वयाच्या 94 वर्षी म्हणजे 27 जून 2008 रोजी एक कृतार्थ जीवन जगून निधन झाले.

त्यांच्या जीवनावर आधारित ‘सॅम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिका साकारत असून त्याचा नवा लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. आज त्यांच्या स्मृतीदिनी विकीने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत हा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

विकीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये माणेकशॉ यांची एक लहानशी झलक दाखविण्यात आली असून व्हिडीओच्या शेवटी विकी माणेकशॉ यांच्या रुपात दिसून येत आहे. यात त्याने माणेकशॉ यांच्याप्रमाणे पोशाख परिधान केला आहे. ‘राजी’ फेम दिग्दर्शिका मेघना गुलजार माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

भारतीय लष्कराचा पोशाख, तोंडावरील स्मितहास्य, मिशा अशा लूकमध्ये विकी हुबेहूब सॅम यांच्यासारखा दिसून येत आहे. 2021 मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. चित्रपटातील काही भागामध्ये 1971 सालच्या युद्धाचा काळ दर्शविला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.