Tribute To Sudhakar Khardekar: श्रीगोंद्याच्या कार्यकर्त्यांचा ‘जय श्रीराम’ हरपला…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेचे श्रीगोंदा येथील ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर गणेश खर्डेकर यांचे नुकतेच तळेगाव दाभाडे येथे निधन झाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व कार्याचा आढावा घेणारा दत्ता जगताप यांचा हा लेख…

———————————————–

श्रीगोंद्याच्या कार्यकर्त्यांचा ‘जय श्रीराम’ हरपला…

काटक, कडक, अजातशत्रू, हसतमुख, हातात छोटी पिशवी, डोक्यावर लालसर तांबूस रंगाची टोपी असणारे, संघाची व विश्व हिंदू परिषदेची गंगाजळी जमा करुन पै पै चा हिशोब ठेवणारे, संघ समर्पित असे नानाविध नावाने ओळख असणारे आपणां सर्वांचे काका म्हणजेच जय श्रीराम काका परम आदरणीय सुधाकर गणेश खर्डेकर (काका) आता आपल्यात राहिले नाहीत.

गेल्या शुक्रवारी रात्री अचानक तब्बेत खराब झाल्याने तळेगाव दाभाडे येथे दवाखान्यात भरती केले. परंतु प्राणवायू पातळी कमी झाल्याने वयाच्या 78 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. ही आपणा र्वांसाठी खूप दु:खद घटना आहे. माझी व आपली सर्वांची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.

काका लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. नगर अर्बन बँकेत प्रामाणिकपणे नोकरी केली. आयुष्यात कधीही कोणाशी खोटे बोलले नाहीत व कोणास खोटे बोलूही दिले नाही. त्यांचा सरळ व साधा स्वभाव. एखादे दिवशी कोणावर चिडले तर दुसऱ्या दिवशी स्वत: पुढे होऊन त्याच्याशी ‘जय श्रीराम’ म्हणून बोलणार!

अनेकांचे प्रेरणा स्थान असणाऱ्या काकांना काही दिवसांपूर्वी ह्रदयविकारा सौम्य झटका आला होता. यामुळे ते बोलू शकत नव्हते. श्रीगोंदा येथे उपचार घेत असताना काकांचे पुतणे महेश खर्डेकर यांनी त्यांना तळेगाव दाभाडे येथे उपचारासाठी नेले होते. उपचारानंतर काकांची तब्बेत सुधारली होती. त्यांना श्रीगोंद्यास यायचे होते, परंतु गेल्या शुक्रवारी रात्री अचानक नियतीने त्यांच्यावर झडप घातली. आपल्यातून काकांना हिरावून घेतले.

Sudhakar Khardekar Passed Away: रा. स्व. संघ व विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर खर्डेकर यांचे निधन

संपूर्ण नगर व पुणे जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर काकांना मानणारे स्वयंसेवक व नागरिक आहेत. संघाचे प्रचारकांचे हक्काचे घर म्हणजे काकांचा वाडा होता. अनेक लहान मोठे कार्यकर्ते काकांना भेटल्याशिवाय जात नव्हते. संघाच्या प्रत्येक कामात काका पुढे असायचे.

भगवान श्रीराम यांच्या आयोध्येतील मंदिर उभारणीसाठी काका पहिल्यापासून अग्रही व तत्पर होते.त्यासाठी अनेक वेळा आयोध्येला काका गेले होते. काकांनी कारसेवा सुध्दा केली होती. त्यांच्या हयातीत आयोध्येत श्रीराम मंदिराची पायाभरणी झाली, याचे त्यांना खूप मोठे समाधान वाटले.

विश्व हिंदू परिषदेच्या एकल विद्यालयाच्या कामासाठी काका अकोला, नाशिक व कर्जतला नेहमी प्रवास करीत असत. ऊसतोड कामगार व विटभट्टी कामगार यांच्या मुलांसाठी निवासी वस्तीगृह व शाळा चालविली जायची. यासाठी काका त्यांच्या एम 80 या मोपेडवर दूर दूर प्रवास करायचे. अजनुज व भानगाव येथे भटके विमुक्तांसाठी वस्तीगृह चालविले जायचे. त्यासाठी सुध्दा संस्कृत व संस्कार वर्ग काका घ्यायचे.

सध्या वयोमानानुसार काका घरीच होते. तरी पण शांत बसलेले नव्हते. जनकल्याण समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णोपयोगी साहित्य केंद्र चालविले जात आहे. याचे सर्व काम काका पहात होते. संघाचा कोणताही कार्यक्रम असला तरी काका लहान मुलाप्रमाणे वेळेच्या अगोदर येऊन वयाचा विचार न करता कामात मदत करत.

काकांना लिखाण व वाचनाची प्रचंड आवड होती. काकांनी स्वत: अभंगगाथा हा ग्रंथ लिहिला होता. याबद्दल वाचक व लेखकांनी काकांचे विशेष अभिनंदन केले होते.

काकांच्या मनात भविष्याबद्दल काही विचार होते. ते स्वप्न त्यांनी मला सांगितले होते. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करुन सत्यात उतरविण्यासाठी त्यांच्या नावाने ‘सुधाकर खर्डेकर (सुख) चॅरिटेबल ट्रस्ट,श्रीगोंदा’ हे ट्रस्ट स्थापन करण्यात आले आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण झालेले त्यांना पहायचे होते. परंतु यापूर्वीच नियतीने काकांना आपल्यातून हिरावून घेतले.

मला प्रिंटींग व्यवसाय उभारणी बरोबरच व्यवसायात कायम मदत करणारे काका होते. काकांबद्दल काय लिहावे व किती लिहावे, असा प्रश्न पडतो आहे.

काकांचा सहवास पुन्हा मिळणार नाही, या विचाराने डोळ्यातील आश्रू व मनातील विचार थांबत नाहीत.

काकांना सर्वांच्या वतीने विनम्र आदरांजली!

दुखांकित…..

– दत्ता जगताप, श्रीगोंदा
सुधाकर खर्डेकर (सुख) चॅरिटेबल ट्रस्ट,श्रीगोंदा
दक्ष नागरिक फाऊंडेशन
सर्व विश्वस्त व स्वयंसेवक तथा नागरिक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.