Chinchwad News : चाळीशी पार केलेल्या त्रिकुटाची पहिल्याच प्रयत्नात आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेला गवसणी

एमपीसी न्यूज – दुर्दम्य इच्छाशक्ती अंगी असल्यास आव्हान कितीही मोठं असलं तरी ते प्रत्येक लहान वाटू लागते. चाळीशी नंतर ब-याच शारिरीक व्याधी आणि आजार सुरू होतात आणि आपण अवघड गोष्टी करण्यास टाळाटाळ करतो. पण, पिंपरी चिंचवड मधील चाळीशी पार केलेल्या त्रिकुटाने प्रबळ ईच्छाशक्तीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेला गवसणी घातली आहे. या स्पर्धेची पात्रता फेरी म्हणून घेण्यात आलेल्या सायकलिंग स्पर्धेत त्यांनी पुणे- गोवा हे अंतर 32 तासात केले पूर्ण आहे.

 

पराग जोशी (वय 44, रा. चिंचवड, उघुउद्योजक), मंगेश कोल्हे (वय 45, रा. चिंचवड, उघुउद्योजक) आणि निलेश घोळवे (वय 42 रा. रावेत, एमएनसी कंपनीत नोकरी) अशी या त्रिकुटाची नावे आहेत. ‘डेक्कन क्लिप हँगर’ या अल्ट्रा सायकलिंग स्पर्धेत तिघांनी पुणे- महाबळेश्वर-कोल्हापूर-गोवा हे 646 किलो मीटर अंतर 32 तासांत पूर्ण केले. त्यापैकी पराग जोशी यांनी 30 तासांत ही स्पर्धा पूर्ण करत पहिल्या दहा स्पर्धकांत आठवे स्थान पटकावले आहे.

इन्सपायर इंडीया या संस्थेच्या दिव्या ताटे यांच्या वतीने अल्ट्रा सायकलिंग ही स्पर्धा घेतली जाते. स्पर्धेचे हे आठवे वर्ष आहे. आंतरराष्ट्रीय रेस अॅक्रॉस अमेरिका (RAAM) या स्पर्धेला पात्र ठरण्यासाठी अल्ट्रा सायकलिंग 32 तासांत पूर्ण करणे आवश्यक असते. शहरातील पराग जोशी, मंगेश कोल्हे आणि निलेश घोळवे यांनी जिद्दीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात RAAM स्पर्धेला गवसणी घातली आहे. मागील दीड वर्षापासून हे तिघेही या स्पर्धेसाठी प्रयत्न करत होते.

पुण्यातील भुगाव येथून शनिवारी (दि.20) सकाळी 7.00 वा या स्पर्धेला सुरूवात झाली, त्यानंतर रविवारी (दि.21) सायंकाळी गोव्यातील भोगमालो बिच येथे स्पर्धेची सांगता झाली. पराग जोशी यांनी 30 तासात ही स्पर्धा पार करत आठवा क्रमांक पटकावला तर, मंगेश कोल्हे आणि निलेश घोळवे यांनी 32 तासात हे अंतर पार केले. तिघांनीही पहिल्याच प्रयत्नात ही खडतर स्पर्धा पार करून RAAM स्पर्धेला पात्र होण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यांच्या या यशामुळे वय हा फक्त आकडा आहे, हे त्यांनी सिद्ध केले आहे.

या यशाबद्दल बोलताना पराग जोशी म्हणाले, ‘आपण ही स्पर्धा 32 तासांत पूर्ण करू असा विश्वास होता. पण, तीस तासात पूर्ण होईल हे स्वप्नवत आहे माझ्यासाठी. त्यात स्पर्धेच्या आठव्या वर्षी माझा आठवा क्रमांक येणे हा देखील एक अनपेक्षित योगायोग आहे. तरूणांनी अशा स्पर्धेत आवर्जून भाग घ्यावा, या स्पर्धेत शारिरीक व मानसिक कस लागतो. आंतरराष्ट्रीय स्पर्धेला पात्र ठरल्याचे वेगळं समाधान आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.