Hinjawadi : ब्रेक फेल झाल्याने अवजड ट्रक महामार्गावर उलटला; वाहनांच्या लांबपर्यंत रांगा

एमपीसी न्यूज – कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरून जात असताना चांदणी चौकाजवळ बावधन येथे ब्रेक फेल झाल्याने अवजड मालवाहतूक करणारा ट्रक उलटला. यामुळे दोन्ही लेनवरील वाहतुकीचा खोळंबा झाला. ही घटना आज, मंगळवारी (दि. 25) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवजड मालवाहतूक करणारा ट्रक दुपारी साडेतीनच्या सुमारास कात्रजकडून देहूरोडकडे जात होता. ट्रकमध्ये चुनखडी भरलेली होती. बावधन येथील चांदणी चौकाजवळ आल्यानंतर ट्रकचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रक महामार्गाच्या दुभाजकावर आदळला आणि देहूरोड-कात्रज या लेनवर पलटी झाला. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला.

हिंजवडी वाहतूक पोलिसांनी दोन क्रेनच्या मदतीने रस्त्यावरील अवजड ट्रक बाजूला केला. दरम्यान, दोन्ही मार्गावरील वाहतूक खोळंबली. वाहनांच्या काही किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या. हिंजवडी वाहतूक पोलिसांनी ट्रक बाजूला काढल्यानांतर सर्व वाहतूक सुरळीत केली आहे. मात्र, यासाठी पोलिसांना तब्बल चार तासांचा अवधी लागला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.