Pune : कायदा आणि सुव्यवस्थेतून तृप्ती देसाई यांना वेगळा न्याय का?

माहिती अधिकार कार्यकर्ता श्रीजित रमेशन यांचे कोची विमानतळ कमांडरांना पत्र

एमपीसी न्यूज – विमानतळ प्राधिकरणाचे नियम झुगारून महिला कार्यकर्ता तृप्ती देसाई आणि त्यांच्या काही महिला कार्यकर्त्यांना विमानतळावर थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे. सामान्य नागरिकांना एक नियम आणि तृप्ती देसाई यांना वेगळा नियम का? असा जाब विचारणारे पत्र माहिती अधिकार कार्यकर्ता श्रीजित रमेशन यांनी कोची विमानतळ कमांडर, केरळचे पोलीस महासंचालक आणि एर्नाकुलमचे पोलीस आयुक्त यांना ऑनलाईन दिले आहे.

श्रीजित रमेशन यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करण्यासाठी महाराष्ट्रातून गेल्या आहेत. मात्र त्यांनी कोची विमानतळ अद्याप सोडलेले नाही. त्यांना शासनाकडून वेगळी सुरक्षा देण्यात येत आहे. ज्याची गरज नाही. कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव प्रवाशांना ठराविक वेळेपेक्षा अधिक काळ विमानतळावर थांबता येत नाही. महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई त्यांच्या काही महिला कार्यकर्त्यांसह कोची विमानतळावर थांबल्या आहेत. ही बाब विमानतळ प्राधिकरणाच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे. एखाद्या सामान्य प्रवाशाला अशी सुविधा उपलब्ध करून देता येत नाही. तरीही तृप्ती देसाई यांना हा वेगळा नियम का? असा जाब पत्रात विचारण्यात आला आहे. तसेच तृप्ती देसाई यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.