Pimpri : पिंपरी कॅम्पात राहणा-या माजी नगरसेवकावर हल्ल्याचा प्रयत्न

हल्लेखोर एका गॅंगचे सदस्य असल्याची चर्चा, एकास एकास ताब्यात घेऊन केली चौकशी

एमपीसी न्यूज – पिंपरी कॅम्प येथील एका माजी नगरसेवकावर घरात घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुरक्षारक्षकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. ही घटना सोमवारी (दि. 14) रात्री बाराच्या सुमारास पिंपरी कॅम्प येथे घडली. घरात घुसण्याचा प्रयत्न करणारे गुंड पिंपरी- चिंचवड शहरातील गुन्हेगारी विश्वात दबदबा असलेल्या एका गॅंगचे सदस्य असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी रात्री एकजण ‘त्या’ माजी नगरसेवकाच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी तेथे तैनात असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी त्याला हटकले. त्यावेळी त्याने आरडाओरडा करीत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचे आणखी दोन साथीदार मोटारीमध्ये दबा धरून बसले होते. गोंधळाचा आवाज ऐकून माजी नगरसेवकाच्या घरातून आणखी काही सुरक्षारक्षक बाहेर आले. त्यावेळी त्या गुंडानी तेथून काढता पाय घेतला.

_MPC_DIR_MPU_II
  • हल्ला परतवून लावणारा ‘तो’ सुरक्षारक्षक गायब
    नगरसेवक रात्री उशिरा घरी आल्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पिंपरी पोलिसांनी पिंपरी गावातून एकास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दारूच्या नशेत नगरसेवकाच्या दारात पोहचल्याची कबुली दिली. मात्र, या घटनेनंतर हल्ला परतवून लावणारा तो सुरक्षारक्षक गायब झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  • मात्र, उलटसुलट चर्चांना उधाण
    माजी नगरसेवक आणि शहरातील एका गँग प्रमुखाचे वैर असल्याचे सर्वश्रुत आहे. गँगच्या सदस्यांनी या माजी नगरसेवकावर यापूर्वी देखील हल्लाचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यामुळे माजी नगरसेवकाच्या सुरक्षेमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. शहरातील सत्ताधारी पक्षातील एका नेत्याच्या गळ्यातील ताईत अशी या माजी नगरसेवकाची ओळख आहे. त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने राजकीय आणि गुन्हेगारी विश्वात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.