Mumbai : मला खोटे पाडण्याचा प्रयत्न, खोटे बोलणा-यांशी मी नाते ठेवणार नाही – उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या युतीवेळी मुख्यमंत्रीपदासह सम-समान पदांच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत याबाबत चर्चा झाली होती. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असे काही ठरले नव्हते. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर ठरले होते.  पण, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी शहा यांच्या आडून मला खोटे पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच खोटे बोलणा-यांशी मी नाते ठेवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवारी) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबत काहीच ठरले नव्हते, असे सांगत शिवसेनेचा दावा खोडून काढला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिले.

2019 च्या लोकसभे वेळी युती करण्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील पुढाकार घेतला होता. आता खोटे बोलणारी माणसे हिंदुत्वाच्या कोणत्या व्याख्यात बसतात? असा सवाल संघाला करत उद्धव ठाकरे म्हणाले, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला खोटे पाडण्याचा प्रयत्न केला आहे. शहा कंपनी खोटी आहे. गोड बोलून त्यांनी आम्हाला संपविण्याचा प्रयत्न केला आहे. यांच्यासोबत गेलो ही माझी चूकच झाली. विधानसभेच्या निकालानंतर अमित शहा यांनी एकदाही फोन केला नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली.

जे ठरलं होते. त्यापेक्षा मला काडीही जास्त नको. शिवसेनेची दारे चर्चेसाठी अजूनही खुली आहेत. सरकार स्थापनेसंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी आम्ही अद्यापही चर्चा केली नाही. शिवसेना जे करते ते जाहीर करते. लपून काही करत नाही. पण, भाजपने आमच्यावर पाळत ठेवू नये. काळजीवाहू मुख्यमंत्री फडणवीस यांनी बहुमत नसताना पुन्हा भाजपचे सरकार येईल, असा दावा कोणाच्या जिवावर केला याचा खुलासा करावा, असेही ठाकरे म्हणाले. त्यांनी त्यांचे पर्याय अगोदर खुले करावेत. पुन्हा मी माझे पर्याय खुले करेल.

जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती, बिहारमध्ये नितीशकुमार आणि रामविलास पासवान यांच्यासोबत भाजप सत्तेत जाते ते कोणत्या हिंदुत्वात बसते असा सवालही त्यांनी भाजपला केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like