Tulapur News: तुळापूरपर्यंत सायकल फेरी काढून छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

एमपीसी न्यूज – छत्रपती संभाजी महाराज यांच्या 333 व्या पुण्यतिथीनिमित्त इंडो थलेटिक सोसायटीच्या वतीने शुक्रवारी तुळापूर सायकल राईड आयोजित करण्यात आली होती.
संपूर्ण भारतात क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेली अग्रगण्य संस्था इंडो थलेटिक सोसायटीच्या वतीने आय़ोजित तुळापूर सायकल राईडमध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 225 सायकलिस्टनी यात सहभाग नोंदवला.
आयएएचे गणेश भुजबळ, अजित गोरे, गिरीराज उमरीकर यांच्या हस्ते निगडी येथील भक्तिशक्ती उद्यान येथे निशाण दाखवून राईडला सुरूवात करण्यात आली. सहभागी सायकलिस्टनी तुळापूर येथील समाधीचे दर्शन घेऊन अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य गाजवून, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.
या राईड साठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले गेले नाही असे संस्थेचे गजानन खैरे व अजित पाटील यांनी सांगितले. राईडचे यंदा सहावे वर्ष होते. सर्व सहभागी सायकलिस्टना खास मेडल देऊन गौरविण्यात आले तसेच संस्थे तर्फे उत्कृष्ट नाष्ट्याची सोय करण्यात आली.
तुळापूर राईडच्या नियोजनामध्ये नितीन पवार, अमित पवार, श्रीकांत चौधरी, विशाल टेकाळे, ओम हिंगे, दीपक नाईक, विजय जगताप, बंटी चिंचवडे, संजय ढवळे, संतोष चिंचवडे, स्वामिनाथन श्रीनिवासन, सचिन जाधव, जनार्दन कत्तुल, प्रतीक पवार,  प्राध्यापक योगेश तावरे यांनी मोलाचा सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.