Tuljapur News : धक्कादायक! तुळजाभवानी देवस्थानच्या नावे बनावट वेबसाईट, अनेकांची लूट

एमपीसी न्यूज – तुळजाभवानी मंदीर देवस्थानच्या नावे बनावट वेबसाईट काढून अनेक भाविकांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. www.tuljabhavani.in या वेबसाईटवरून वेगवेगळ्या विधींसाठी पैसे आकारण्यात आले आहेत. या सगळ्या प्रकारानंतर संबंधित वेबसाईटच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना काळात म्हणजेच गेल्या २ वर्षांपासून तुळजाभवानी मंदिरात शासकीय पुजा वगळता अभिषेक विधी किंवा इतर विधी बंद आहेत. मात्र या बनावट वेबसाईटवर सगळे विधी उपलब्ध असल्याचे दाखवण्यात येत आहेत. यासंबंधी तक्रार करण्यात आली असून अज्ञात लोकांनी ही वेबसाईट बनवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या वेबसाईटवर गेल्यास पूजा, प्रसाद सेवा असे पर्याय दिसतात. त्यावर क्लिक केल्यास अभिषेक, अलंकार महापूजा, खण – नारळ ओटी पूजा, जागरण गोंधळ, अन्नदान अशा अनेक पुजांचे पर्याय समोर येतात. आणखी पुढे गेल्यास ‘पे फॉर प्रसाद’ सेवा म्हणून एक पर्याय येतो आणि त्यावर क्लिक केलं की, फोन नंबर मागितला जातो आणि नंतर फॉर्म भरून लगेचच पैसे वसूल केले जातात.

साधारण बहुतांशी मंदिरात ऑनलाईन पुजा आणि त्या संबंधीत विधींसाठी रक्कम असे अनेकदा पर्याय उपलब्ध असतात. त्याचा लाभ अनेक लोक घरबसल्या घेतात. मात्र, या घटनेत केवळ शासकिय पुजेलाच परवानगी असताना अनेक विधींचे पर्याय ही वेबसाईट दाखवत दाखवत होती आणि विधीप्रमाणे शुल्क सुद्धा आकारण्यात येत होते.

दरम्यान, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे भाविकांकडून तक्रार दाखल करण्यात आली असून यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.