Navratri 2021 : तुळजाभवानी उत्सवात लसीकरणाचे बंधन! रोज केवळ 60 हजार भाविकांनांच प्रवेश

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा देखील अगदी साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. रोज केवळ 60 हजार भाविकांनांच मातेचं दर्शन घेता येणार आहे. शिवाय, लशीचे दोन डोस पुर्ण केलेल्या भाविकांनाच मंदीरात प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्रावरील कोरोनाचे संकट ओसरले नसले तरी काही प्रमाणात निर्बंधांमध्ये शिथिलता मिळू लागली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील जनता सुखावल्याचे चित्र आहे. या निर्बंध शिथिलीकरणामध्ये मंदीरं खुली करण्याची मिळालेली मुभा हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मंदीरं खुली करण्यात येणार आहे. तरीसुद्धा कोरोना संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव या वर्षी देखील अगदी साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. दिवसाला केवळ 60 हजार भाविकांच्या दर्शनाची मर्यादा ठेवण्यात आली असून लसीकरणाचे दोन्ही डोस झालेल्या भाविकांनांच दर्शनासाठी प्राधान्य मिळणार आहे.

गर्दी टाळण्यासाठी उस्मानाबादमध्ये तुळजापूर प्रशासनाच्या वतीनं तीन दिवस कडक जिल्हाबंदी करण्यात आली आहे. पौर्णिमाला कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यासह देशभरातून अनेक भाविक तुळजापूर येथे आई तुळजाभवानी देवीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या तीन दिवसांत एकही वाहन किंवा भाविकांना जिल्ह्यात येण्यास बंदी असेल.

शिवाय, तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी योग्य त्या कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन मंदिर प्रशासकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.