Tuljapur News: मराठा मोर्चाच्या सात समन्वयकांवर तुळजापूरमध्ये गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणासाठी तुळजापूर येथे काढण्यात आलेल्या मोर्चात कोरोनामुुुळे लागू कलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या नियमांचे पालन झाले नसल्याचा ठपका ठेवत मोर्चा समन्वयकावर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सुप्रिम कोर्टात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. ही स्थगिती उठवून आरक्षण मिळावे अशी मागणी पुन्हा होत आहे. त्याअनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे 9 ऑक्टोंबर रोजी मराठा आरक्षणाच्या तिसऱ्या पर्वाला जागरण गोंधळ घालून सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तुळजाभवानी मंदिरापर्यंत  काढण्यात आला होता.

आंदोलनात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही सहभाग घेतला होता. या मराठा आरक्षण मोर्चात सुमारे दोन हजारावर आंदोलक होते.

आंदोलनादरम्यान, गर्दीतील अनेकांनी मास्क न लावणे. त्याचबरोबर, शारीरिक अंतराचे पालन न करणे. यामुळे निष्काळजीपणाचे कृत्य करून कोरोना प्रसाराची शक्यता निर्माण केल्याचा ठपका ठेवत मोर्चा आयोजन करणाऱ्या सात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोर्चाचे आयोजक सज्जन साळुंके, जीवन इंगळे, अर्जुन साळुंके, महेश डोंगरे, धैर्यशील पाटील, सुनील नागने, अजय साळुंके यांच्याविरुद्ध कलम- 188, 269, 270 आणि म.पो.का. कलम- 135 अन्वये पोलीस प्रशासनाने गुन्हा नोंदवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.