Tuljapur News : घटस्थापनेने श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सवास प्रारंभ

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे शनिवारी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपारीक पध्दतीने श्री तुळजाभवानीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते आज, रविवारी विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोच्चाराने, आई राजा उदो-उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व पुजाविधी करण्यात आले.

यावेळी मंदिरातील पहिल्या दिवसाच्या मुख्य पुजेचा मान यशराज मुकूंद कदम यांना मिळाला. त्यांनी मंदिरात विधिवत पूजन केले. त्यानंतर घटकलशाची पारंपरिक पध्दतीने पुजा करुन गोमुख तिर्थापासून या घटकलशांची मिरवणूक काढण्यात आली.

मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ति या मंदिरामध्ये जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना करण्यात आली.

मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाविकांच्या दर्शनाच्या सोयीसाठी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेत स्थळावर(www.shrituljabhavani.org) ऑनलाईन दर्शन व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी दर्शन सुविधेचा लाभ घरी बसुनच घ्यावा, असे आवाहन करुन सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या.

यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, उपविभागीय अधिकारी सचिन गिरी, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, महंत तुकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, महंत चिलोजी बुवा पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी, अमर कदम, सज्जन साळुंके, अनंत कोंडो तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) सौदागर तांदळे मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इन्तुले, जयसिंग पाटील, नागेश शितोळे आदी उपस्थित होते. याशिवाय भोपे, पुजारी, आराधी, गौंधळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.