Pune News : ‘वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार’ मनसेला जय महाराष्ट्र करणाऱ्या रूपाली ठोंबरेंचे ट्विट

एमपीसी न्यूज : पुण्यातील मनसेच्या नेत्यांना रुपाली पाटील ठोंबरे यांनी दोन दिवसांपूर्वीच पक्षातुन राजीनामा दिला होता. राजीनामा देताना त्यांनी राज ठाकरे यांच्या नावाने पत्र लिहून राज ठाकरे हे नाव हृदयात कायमच राहील असं सांगितलं होतं. त्यानंतर त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर खुद्द रूपाली पाटील यांनीच याविषयी एक ट्विट केलं आहे. त्याद्वारे त्या आता महाविकास आघाडीत जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

“आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे हात नाहीत व पवार साहेब चुकून नमस्कार करतील असे पाय दिसत नाहीत, हो म्हणूनच ठरलय! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकासआघाडीत स्थिरावणार..” असं ट्विट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केले. यावरूनच या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार हे नक्की झाले.

दरम्यान मागील 14 वर्षापासून रुपाली पाटील ठोंबरे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काम करत होत्या. परंतु दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या सर्व पदाचा राजीनामा दिला. पक्षातीलच काही रिकामटेकड्या लोकांमुळे आपण पक्ष सोडत असल्याचे त्यांनी सांगितलं होतं. रूपाली पाटील यांच्या राजीनाम्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर त्या कुठल्या पक्षात जाणार याविषयी उत्सुकता रंगली होती. परंतु आज त्यांनी ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार हे नक्की केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.