Twinkle shares Superstar Father’s photos: ट्विंकल म्हणते, ‘माझ्यासाठी फादर्स डे डिसेंबरमध्येच असतो…’

Twinkle shares Superstar Father's photos: Twinkle says, 'For me, Father's Day is in December'... '29 डिसेंबरला माझा आणि बाबांचा दोघांचाही वाढदिवस असतो. या योगायोगाची मला गंमत वाटते'. असं ट्विंकलनं म्हटलं आहे.

एमपीसी न्यूज – हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला सुपरस्टार असे ज्यांचे वर्णन केले जाते ते म्हणजे राजेश खन्ना. ज्यांच्या मान वेळावण्यावर देखील मुली फिदा असत. मात्र त्यांनी ‘बॉबी’ गर्ल डिंपल कपाडिया हिच्याशी अचानकपणे लग्न करुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. पुढे त्यांना ट्विंकल आणि रिंकी या दोन मुली झाल्या. लग्नानंतर काही वर्षांनी डिंपल, राजेश यांच्यापासून विभक्त झाल्या. त्यानंतर 2012 मध्ये राजेश खन्ना यांचे निधन झाले, पण आजही त्यांचा करिश्मा बॉलिवूडमध्ये कायम आहे.

‘फादर्स डे’ च्या निमित्ताने त्यांची मुलगी ट्विंकल हिने राजेश यांच्या आठवणी फोटोच्या रुपाने जागवल्या आहेत. तिने इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड केले आहेत. त्यात ट्विंकल म्हणते आहे की, ‘सर्वांसाठी फादर्स डे जरी जूनमध्ये असला तरी माझ्यासाठी तो डिसेंबरमध्येच असतो. कारण 29 डिसेंबरला माझा आणि बाबांचा दोघांचाही वाढदिवस असतो. या योगायोगाची मला गंमत वाटते’.

‘माझ्या आईला ते म्हणाले होते की मी म्हणजे तिने त्यांना दिलेली सर्वांत उत्कृष्ट भेट आहे. आमचा दोघांचा जन्मदिवस एकच असल्याने त्या दिवशी त्यांचा 31 वा वाढदिवस होता. ते मला ‘टीना बाबा’ म्हणत असत. कधीही बेबी म्हणाले नाहीत. त्याचं वेगळेपण मला तेव्हा कळत नव्हतं पण त्यावेळच्या इतर मुलींपेक्षा त्यांनी मला खूप वेगळं वाढवलं’.

डिंपल कपाडिया या ट्विंकलच्या आईपासून विभक्त झाल्यानंतरही राजेश खन्ना ट्विंकलच्या खूप जवळ होते. ट्विंकल पुढे म्हणते की, ‘मी जेव्हा प्रेमात पडले होते तेव्हा मला त्यांनी एकदा सांगितले होते की, ते अशा एका जीवनसाथीच्या शोधात आहेत की ते आणि ती एकच पुस्तक एकमेंकांच्या सोबतीने वाचू शकतील. ते गंमतीने म्हणत की एकच बॉयफ्रेंड नको करुस. चार – चार कर. कारण त्यामुळे तुझा कधीच ब्रेकअप झाला तरी तुला चिंता असणार नाही. पण मी त्यांना हे कधीच सांगितले नाही की माझे मन दुखावणारी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे माझे बाबा स्वत:’.

अक्षयकुमार या प्रथितयश अभिनेत्याची पत्नी असणारी ट्विंकल स्वत: एक उत्तम लेखिका आहे. काही हिंदी चित्रपटात काम केल्यानंतर तिने अभिनयाला रामराम केला आहे. आरव आणि नितारा या दोन मुलांची आई असणारी ट्विंकल सोशल मिडीयावर कधीकधी सक्रिय असते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.