New Delhi : नकाशातील चुकीबाबत ‘ट्विटर’ने मागितली भारत सरकारची लेखी माफी

एमपीसी न्यूज : लेह आणि लद्दाख हा चीनचा भूभाग असल्याचे नकाशात दाखविल्याबद्दल ‘ट्विटर’ने व्यक्तिगत माहिती सुरक्षाविषयक संसदीय समितीकडे लेखी माफी मागितली आहे. तसेच ही चूक दि. ३० नोव्हेंबरपर्यंत दुरुस्त करण्याची हमीही देण्यात आली आहे, अशी माहिती समितीच्या अध्यक्ष मीना लेखी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

नकाशातील चुकीबाबत ट्विटरचे मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी डेमियन केरेन यांच्या सहीचे प्रतिज्ञापत्र समितीला सादर करण्यात आले आहे. भारतीयांच्या भावना या प्रकारामुळे दुखावल्या गेल्याबद्दल त्यांनी माफी मागितली असून ही चूक या महिन्याच्या अखेरीपर्यंत दुरुस्त करण्याचे आश्वासन या प्रतिज्ञापत्रात देण्यात आल्याचे लेखी यांनी सांगितले.

यापूर्वी या प्रकरणी संसदीय समितीसमोर उपस्थित असलेल्या ‘ट्विटर’च्या अधिकाऱ्यांनी माफी मागितली होती. मात्र, भारताच्या सार्वभौमतेबाबत केलेली चूक ही अनावधानाने घडलेली सामान्य चूक नाही, तर हा अपराध आहे, याकडे समितीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. याबद्दल लेखी माफीनामा आणि ही चूक दुरुस्त करण्याची हमी प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे आदेश ‘ट्विटर’ला देण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.