Pune News : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नागरिकांना लुटणार्‍या दोघांना अटक

एमपीसी न्यूज : पायी जाणाऱ्या नागरिकांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.(Pune News) हे दोघे पायी जाणाऱ्या नागरिकांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून त्यांना निर्जनस्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील किंमती सामान लुटत होती. त्यांनी केलेले जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.

संतोष धनगर, वय 27 वर्षे, रा. गोपाळवस्ती बेलगाव, ता. गेवराई, जि. बीड व ऋषिकेश गुंड, रा. बेलगाव, ता. गेवराई, जि. बीड या दोन आरोपिंना जेरबंद करण्यात आले आहे.

पुणे ग्रामीणच्या इंदापूर व भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 ऑक्टोबर 2022 रोजी रात्रीच्या सुमारास पुणे- सोलापूर हायवे रोड लगत पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीमध्ये लिफ्ट देण्याचा बहाणा करून पॅसेंजरना थोडे अंतर पुढे गेल्यावर चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोबाईल फोन बळजबरीने काढून घेऊन त्यांना तिथेच सोडून दिले होते. याबाबत इंदापूर व भिगवन पोलीस ठाण्यामध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकूण 69,000 रूपये रक्कमेचा मुद्देमाल जबरी चोरी करून चोरला होता.

पोलीस आयुक्त अंकित गोयल यांनी अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, अप्पर पोलीस अधीक्षक अधिक्षक मितेश घट्टे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण येथे वेगवेगळ्या टीम्स तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Pimpri News : कामाचे स्वरूप, जबाबदारीची माहिती दिल्यास कामाच्या गुणवत्तेत सुधारणा – जितेंद्र वाघ  

या गुन्ह्याचा समांतर तपास चालू असताना पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने तपास पथक तयार करून व तांत्रिक विश्लेष्णाचा अभ्यास करून वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे संतोष धनगर वय 27 वर्षे, रा. गोपाळवस्ती बेलगाव, ता. गेवराई, जि. बीड या आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास करताना त्याच्याकडे चोरीस गेलेला माल मिळाला.

त्याच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केल्यावर त्याने भिगवण व इंदापूर पोलीस ठाण्यात नोंद असलेले दोन्ही गुन्हे त्याचे साथीदार ऋषिकेश गुंड, रा. बेलगाव, ता. गेवराई, जि. बीड, असाफ शेख, रा. रोहतवाडी, ता. पाटोदा, जि. बीड व अतुल उर्फ डॉक्टर विक्रम वाघमारे, रा. शिवाजीनगर, बीड यांच्यासह केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यावरून ऋषिकेश गुंड याला ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित आरोपी वाशी पोलीस ठाणे, उस्मानाबाद जिल्हा येथील वेगवेगळ्या गुन्ह्यात जेल मध्ये आहेत.(Pune News) या आरोपींनी फलटण व करमाळा या ठिकाणी अशाच प्रकारे गुन्हे केले असल्याचे सांगितले आहे व त्याबाबत तपास चालू आहे. संतोष धनगर विरोधात यापूर्वी 7 गुन्हे दाखल असून ऋषिकेश गुंड याच्या विरोधात 1 गुन्हा दाखल आहे. अतुल वाघमारे, रा. शिवाजीनगर, बीड याच्या विरोधात 12 गुन्हे दाखल आहेत. असफल शेक विरोधात 7 गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.